मनीषा म्हात्रे / मुंबई: आधीच मोडकळीस आलेली शवागृहे त्यात क्षमतेपेक्षा जास्त मृतदेह ठेवल्यामुळे त्यांना आता उतरती कळा लागल्याने ही शवागृहेच मृत्यूशय्येवर असल्याचे भीषण चित्र दिसून येत आहे. याकडे पालिका प्रशासन आणि पोलिस यंत्रणा कानाडोळा करत आहेत. शवागृहात विच्छेदनासाठी आणलेल्या मृतदेहांना सहा ते सात दिवसांत नेणे बंधनकारक असतानाही दोन ते तीन महिने हे मृतदेह शवागृहातच सडत असल्याची धक्कादायक बाब समोर आली. सध्या या शवागृहात ४५ बेवारस मृतदेह गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून शवागृहातच कुजत होते. रु ग्णालय प्रशासनाने केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे काही मृतदेह नेण्यात आले. मात्र, अजूनही १३ मृतदेह शवागृहातच पडून असल्याचे सूत्रांनी सांगितले. घाटकोपर पूर्व येथील पालिकेच्या राजावाडी रु ग्णालयातील शवागृहात दिवसाला १० ते १२ मृतदेह शवविच्छेदनासाठी येतात. मुलुंड, भांडूप, कांजूर, विक्र ोळी,घाटकोपर, विद्याविहार, कुर्ला, गोवंडी, मानखुर्द, चेंबूर या परिसरातून अपघात, हत्या, नैसर्गिक मृत्यू अशा कारणांनी मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह येथे विच्छेदनासाठी येतात. राजावाडी रु ग्णालय हे मोक्याच्या ठिकाणी असल्याने येथे हे प्रमाण जास्त आहे. रु ग्णालयाच्या शवागृहात ६० मृतदेह ठेवण्याची क्षमता आहे. या शवागृहात दोन वातानुकुलित यंत्रे आहेत. एकीकडे दोन वर्षांपूर्वी नुतनीकरण झालेल्या या शवागृहाच्या इमारतीला गळती लागली आहे. इमारतीच्या काही भागांना घुशींनी पोखरून ठेवले आहे. मृतदेह घेऊन आलेल्या नातेवाईकांना बसण्यासाठी केलेली आसनव्यवस्था मोडकळीस आली आहे. त्यात शवागृहातील मनुष्यबळही अपुरे आहे. क्षमतेपेक्षा अधिक मृतदेह शवागृहात असल्यामुळे दुर्गंधीसह कर्मचार्यांच्या आरोग्यासाठीही हा मोठा धोका ठरत आहे. याबाबत अनेकदा तक्रारी करुनही दुर्लक्ष होत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. तसेच विलेपार्ले येथील कुपर रुग्णालयाच्या शवागृहाचीही हीच अवस्था आहे. या शवागृहातही दोन वातानुकुलित यंत्र आहेत. शवागृहातील वातानुकुलित यंत्र जुने असल्यामुळे अनेकदा ते बंद स्थितीत असतात. त्यामुळे येथे जास्त दिवस मृतदेह ठेवणे डॉक्टरांनाच डोकेदुखी ठरत आहेत. त्यात अपुर्या मनुष्यबळामुळे डॉक्टर कमालीचे वैतागले आहेत. तर दुसरीकडे गोरेगाव येथील सिद्धार्थ हॉस्पिटलमध्ये शवागृह तयार आहे. मात्र, अपुर्या मनुष्यबळामुळे येथील शवागृहे बंद अवस्थेत आहेत. याबाबत संबंधित अधिकार्याकडे विचारणा केली असता, ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.
पालिका रु ग्णालयातील शवागृहेच मृत्यूशय्येवर
By admin | Updated: August 17, 2014 23:35 IST