मुंबई : लसीच्या मर्यादित साठ्यामुळे शहरातील लसीकरणाची गती कमी झाली आहे. एकीकडे कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरीही दुसरीकडे तिसऱ्या लाटेचा धोका व्यक्त केला जात आहे. परिणामी, आता पालिकेने झोपडपट्टीच्या वस्तीत लसीकरणाला गती देण्यासाठी खासगी रुग्णालयांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेसोबत लसीकरण करण्यास प्राथमिक पातळीवर २-३ खासगी रुग्णालयांनी सकारात्मकता दर्शविली आहे.
मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, पालिकेच्या वॉर्डमध्ये लस घेतलेल्यांची माहिती जमा करून खासगी रुग्णालयांना देण्याचा विचार आहे. तसेच, झोपडपट्टीच्या वस्तीत खासगी रुग्णालयांनी पुढाकार घेऊन लसीकरण केंद्र सुरू करावे, या दृष्टीकोनातून विचार करण्यात येत आहे. खासगी रुग्णालयांकडेही लसींचा अतिरिक्त साठा नाही. मात्र, सीएसआर उपक्रमांतर्गत काही डोस झोपडपट्टीतील लोकांना देण्यासाठी खासगी रुग्णालयांनी सकारात्मकता दाखविली आहे.
तुटवड्यामुळे या महिन्यात लसीकरणात पाच दिवस खंड पडला आहे. त्यामुळे राज्य शासन व पालिका प्रशासनाने केंद्र शासनाकडे डोस वाढवून देण्यासाठी प्रस्ताव पाठविला आहे, असेही काकाणी यांनी सांगितले.