Join us  

समुद्राचे पाणी गोडे करण्यासाठी पालिका सल्लागार नेमणार, जबाबदारी इस्त्राईल कंपनीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2021 8:55 PM

मुंबई - गोराई येथे पालिकेने खाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करुन दररोज दोनशे दशलक्ष लिटर पिण्यास योग्य पाणी तयार करण्याचा प्रकल्प ...

मुंबई - गोराई येथे पालिकेने खाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करुन दररोज दोनशे दशलक्ष लिटर पिण्यास योग्य पाणी तयार करण्याचा प्रकल्प उभारण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. या प्रकल्पासाठी पालिकेमार्फत सल्लागार नियुक्त करण्यात येणार आहे. यासाठी दीडशे कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. 

या प्रकल्पाची व्यवहार्यता तपासण्याची जबाबदारी इस्त्राईल कंपनीवर पालिकेने सोपवली आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात दोनशे दशलक्ष लिटर तर कालांतराने विस्तार करुन दररोज चारशे दशलक्ष लिटर पिण्याचे पाणी तयार करण्याचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी नियुक्त सल्लागार कंपनीला प्रकल्प अहवालाची पडताळणी, प्रकल्पाचे डिझाईन तपासावे लागणार आहे. तसेच प्रकल्प उभारला जात असताना देखरेख ठेवण्याचे काम या सल्लगाराचे असणार आहे. 

या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात वीज खर्च होणार आहे. तसेच शुध्दीकरणाचा दरही अधिक असल्याने प्रकल्पासाठीचा खर्च अधिक असणार आहे. त्याचबरोबर धरणातील पाणी पिण्यायोग्य करण्यासाठी प्रत्येक एक हजार लिटरसाठी १७ रुपये खर्च केला जातो. या प्रकल्पामध्ये हा खर्च १८ रुपयांपर्यंत पोहोचणार आहे. दोनशे दशलक्ष लिटरच्या प्रकल्पासाठी १८०० कोटी रुपये खर्च होणे अपेक्षित आहे. सन २०२५ पर्यंत महापालिकेला हा प्रकल्प सुरु करायचा आहे.

टॅग्स :मुंबादेवीइस्रायल