मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलाव क्षेत्रात अपुरा पाणीसाठा असल्याने मुंबईवर वीस टक्के पाणी कपातीचे संकट ओढवल्याने पिण्याच्या पाण्याव्यतीरिक्त उर्वरित कामांसाठी विहिरींच्या पाण्याचा वापर करण्याबाबत लोकप्रतिनिधींकडून वारंवार आवाज उठविण्यात येत आहे. परंतू पालिका प्रशासन अद्यापही शहरातील विहिरींची माहिती घेण्यातच व्यस्त असून, या विहिरींच्या पाण्याचा वापर करायचा कधी, असा यक्षप्रश्न मुंबईकरांसमोर उभा आहे.महापालिकेने रहिवासी क्षेत्रासाठी वीस टक्के तर औद्योगिक क्षेत्रासाठी पन्नास टक्के पाणीकपात लागू केली. ही पाणीकपात लागू झाल्यापासून पालिका सभागृह आणि स्थायी समितीच्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी पाण्यावरून सत्ताधाऱ्यांसह प्रशासनाला वारंवार फैलावर घेतले आहे. विशेषत: शहराच्या तुलनेत पूर्व आणि पश्चिम उपनगरात पाण्याच्या वाटपात समतोल नाही, असेही निदर्शनास आणून दिले आहे. परिणामी पाणी कपातीमुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरात पाण्याचा प्रश्न अधिकच बिकट झाला आहे. शिवाय दूषित पाण्याच्या प्रश्नानेही डोके वर काढले आहे. पूर्व उपनगरात भांडूप, विक्रोळी आणि मुलुंड येथील डोंगर उतारावरील वस्त्यांनाही पाणी प्रश्न भेडसावत असून, यावर अद्यापही तोडगा काढण्यात आलेला नाही.पाणी कपात लागू झाल्यानंतर विहिरींच्या पाण्याचा वापर करता यावा म्हणून महापालिका प्रशासनाने शहर आणि उपनगरातील विहिरांचा शोध सुरु केला. या विहिरी स्वच्छ करून त्यातील पाण्याचा वापर पिण्याव्यतीरिक्त उर्वरित गोष्टींसाठी वापरता येईल, असा या मागचा हेतू होता. (प्रतिनिधी)
तहान लागल्यावर पालिका खणते विहिर !
By admin | Updated: December 21, 2015 01:42 IST