Join us

निवडणुकीसाठी पालिका सज्ज

By admin | Updated: March 31, 2015 02:17 IST

नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणूक अर्ज स्वीकारण्यासाठी १० ठिकाणी सोय करण्यात आली आहे.

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणूक अर्ज स्वीकारण्यासाठी १० ठिकाणी सोय करण्यात आली आहे. १११ प्रभागांसाठी ७६८ मतदान केंद्रे ठेवली असून निवडणूक पार पाडण्यासाठी तब्बल ४,६०५ कर्मचारी नियुक्त केले आहेत. आचारसंहिता भंगाच्या घटनांवर लक्ष ठेवण्यासाठीही स्वतंत्र पथके तयार केली आहेत. महापालिकेच्या पाचव्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज विक्री व स्वीकारण्यास ३१ मार्चपासून सुरवात होणार आहे. पालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषद घेवून केलेल्या तयारीची माहिती दिली. ३१ मार्च ते ७ एप्रिल दरम्यान नामनिर्देशनपत्र देण्यास सुरवात केली जाणार आहे. १० निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून प्रत्येकावर ९ ते १२ प्रभागांची जबाबदारी दिली आहे. १११ प्रभागांपैकी गावठाण क्षेत्रात २९, झोपडपट्टीमध्ये १७ व सिडको विकसित नोडमध्ये ६५ प्रभागांचा समावेश आहे. निवडणुकीदरम्यान आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे यासाठी मधुकर पुसेकर यांची आचारसंहिता विभागप्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्यासोबत पालिकेचे अतिक्रमण उपायुक्त सुभाष गायकर व इतर अधिकाऱ्यांची टीम देण्यात आली आहे. कुठेही आचारसंहिता भंगाची घटना घडल्यास कडक कारवाई करण्यात येणार असून संबंधित ठिकाणचे व्हिडीओ चित्रीकरणही करण्यात येणार आहे. निवडणुकीदरम्यान होर्डिंग्ज व इतर परवान्यांसाठी सिंगल विंडो प्रणाली राबविण्यात आली आहे. प्रत्येक उमेदवारास ४ लाख रुपयांपर्यंत खर्च करता येणार आहे. रोजच्या खर्चाचा तपशील दुसऱ्या दिवशी २ वाजेपर्यंत द्यावा लागणार आहे. ११०० ते १२०० मतदारांसाठी एक मतदान केंद्र केले जाणार असून शहरात एकूण ७६८ केंदे्र राहणार असून ४,६०५ कर्मचारी आवश्यक आहेत. कोकण भवन, सिडको, ठाणे, मीरा - भार्इंदर, कल्याण - डोंबिवली महापालिकेतील कर्मचाऱ्यांची यासाठी नियुक्ती केली आहे. त्यांच्यासाठी ७ व ८ एप्रिलला पहिले तर १५ व १६ तारखेला दुसरे प्रशिक्षण शिबिर घेण्यात येणार आहे. निवडणुकीसाठी १०९८ इव्हीएम मशीन लागणार आहेत. यामधील ७६८ केंद्रांसाठी प्रत्येकी एक, २९० राखीव व प्रशिक्षणासाठी १०० मशीनचा उपयोग होणार आहे. ही मशीन ठेवण्यासाठी गौरव म्हात्रे कला केंद्रामध्ये स्ट्राँगरूम तयार केली जाणार आहे. सीवूडमधील डॉन बॉस्को विद्यालय, वाशीतील सिक्रेट हार्ट हायस्कूल, नवी मुंबई सिटी हायस्कूल, घणसोली व सरस्वती विद्यालय, ऐरोली या चार ठिकाणी मतमोजणी केली जाणार आहे.