Join us  

वृक्ष छाटणीसाठी पोलिस संरक्षण द्या ! पर्यावरणप्रेमींच्या विरोधामुळे पालिकेचे साकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 10:35 AM

पावसाळ्यापूर्वी झाडांच्या फांद्या छाटण्या, धोकादायक झाडे तोडणे, आदी कामांवर मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाने भर दिला आहे.

मुंबई : पावसाळ्यापूर्वी झाडांच्या फांद्या छाटण्या, धोकादायक झाडे तोडणे, आदी कामांवर मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाने भर दिला आहे. मात्र, पालिकेच्या 'एच पश्चिम' विभागात कर्मचाऱ्यांना पर्यावरणप्रेमींच्या विरोधाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना काम करणे अवघड झाले आहे. परिणामी या विभागातील उद्यान खात्याच्या अधिकाऱ्यांनी थेट पोलिसांतच तक्रार दाखल केली असून, संरक्षणाची मागणी केली आहे. पावसाळ्यात अनेकदा रस्त्यावरील वाहनांवर फांद्या पडण्याचे प्रकार घडतात. 

मुसळधार पाऊस, तसेच जोरदार वेगाने वारे वाहत असल्यास कमकुवत झाडे पडण्याची शक्यता असते. झाडांच्या फांद्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने झाडावर अतिरिक्त भार पडून झाड पडण्याचा धोका असतो. त्यामुळे धोकादायक झाडे किंवा फाद्यांमुळे अपघात होऊ नये यासाठी पावसाळ्याच्या तोंडावर त्यांची छाटणी करण्याचे काम एप्रिलपासून पालिकेच्या उद्यान विभागाकडून हाती घेतले जाते. सध्या प्रत्येक विभागात ही कामे सुरू आहेत. 

मात्र, 'एच-पश्चिम' विभागातील अंधेरी, सांताक्रुझ या विभागात या कामांना पर्यावरणप्रेमींचा विरोध होत असल्याने उद्यान विभागाचे कर्मचारी हैराण झाले आहेत. काही वेळेस हेच पर्यावरणप्रेमी स्वतः पोलिसांत पालिकेविरोधात तक्रार करतात. त्यामुळे काम करणे अवघड झाले आहे. अशाप्रकारे विरोध होत राहिला, तर काम करणे अवघड आहे. त्यामुळे आमच्या कर्मचाऱ्यांना संरक्षण द्यावे, अशी मागणी 'एच पश्चिम' विभागाच्या उद्यान विभागाने सांताक्रुझ पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांकडे पत्राद्वारे केली आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकामुंबई पोलीस