Join us

48 तासात खड्डे बुजवू ही पालिका प्रशासनाची घोषणा ठरली लोणकढी थाप !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 19:54 IST

आर उत्तर वॉर्डमध्ये तर खड्डे बुजवायला मटेरियलच नाही!

मनोहर कुंभेजकर

 मुंबई - 48 तासात खड्डे बुजवू अशी भीमगर्जना मुंबई महानगर पालिकेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत पालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी केली होती.ही डेड लाईन देखिल उलटून गेली आहे.मात्र पालिका प्रशासनाची ही घोषणा लोणकढी थापच ठरली आहे.कारण दहिसर येथील आर उत्तर वॉर्डमधील खड्डे बुजवायला येथील पालिका प्रशासनाकडे लागणारे मटेरियलच नाही अशी चक्क धक्कादायक कबुली आज येथील सहाय्यक पालिका आयुक्त संध्या नांदेडकर यांनी आर मध्य व आर उत्तर येथील प्रभाग समितीच्या बैठकीत दिली. बोरिवली पश्चिम येथील आर मध्य येथे ही बैठक प्रभाग समिती अध्यक्ष रिद्धी खुरसंगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.या बैठकीला दोन्ही प्रभागातील एकूण 19 नगरसेवक उपस्थित होते.प्रभाग समितीच्या बैठकीत खड्यांवरून जोरदार रणकंदन झाले. यावेळी लोकप्रतिनिधींनी तर खड्यांवरून येथील पालिका प्रशासनाला चांगलेच फैलावर घेतले.

शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक 7 च्या नगरसेविका शीतल मुकेश म्हात्रे यांनी या बैठकीत आर उत्तर वॉर्ड मध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून हे खड्डे पालिका प्रशासन कधी बुजवणार असा एका औचित्याच्या मुद्याद्वारे संध्या नांदेडकर यांना जाब विचारला, तेव्हा आर उत्तर विभागात खड्डे बुजवायला पालिका प्रशासनाकडे मटेरियलच नाही अशी धक्कादायक कबुलीच त्यांनी या बैठकीत दिली.त्यावेळी संतप्त झालेल्या शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे व नगरसेवक संजय घाडी यांनी शिवसेना स्टाईलने प्रशासनावर हल्लाबोल चढवला.आर उत्तर प्रभागात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असतांना पालिका प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून या गंभीर प्रश्नांकडे कानाडोळा करते आहे,लोकप्रतिनिधी म्हणून नागरिक आंहाला या खड्यांबाबत विचारणा करतात,त्यावेळी आम्ही काय उत्तर द्यायचे.मुद्दामून खड्डे बुजवण्यासाठी  मटेरियलच नाही,हा तर शिवसेनेला मुद्दाम बदनाम करण्याचा पालिका प्रशासनाचा डाव तर नाही ना?असा सवाल नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी केला.देशाची आर्थिक राजधानी असा टेभा मिरवणाऱ्या आणि एका राज्याच्या अर्थसंकल्प असणाऱ्या मुंबई महानगर पालिका प्रशासनाकडे खड्डे बुजवायला मटेरियलच नाही? ही अजब गोष्ट आहे अशी बोलकी प्रतिक्रिया त्यांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केली. या बैठकीत प्रभाग क्रमांक 5 चे शिवसेनेचे नगरसेवक संजय घाडी यांनी संध्या नांदेडकर यांना उपरोधात्मक सवाल करतांना विचारले की,आर उत्तर वॉर्ड मध्ये खड्डे बुजवायला आमच्याकडे मटेरियलच नाही असा मोठा बॅनरच पालिका प्रशासनाने ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत तिकडे लावून संबाधित पालिका अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर निर्देशित करावेत म्हणजे तुम्हाला  नागरिकांच्या शिव्यांचा पाऊसच पडेल असा टोला त्यांनी लगावला.आर उत्तर विभागात पालिका प्रशासनाकडे खड्डे बुजवायला मटेरियलच नाही का ? याबद्धल लोकमतने सहाय्यक पालिका आयुक्त संध्या नांदेडकर यांच्याशी संपर्क साधला असता खड्डे बुजवण्यासठी आमच्या वॉर्डकडे सध्या मटेरियल नसून येत्या दोन दिवसात मटेरियल येईल अशी माहिती त्यांनी दिली.