Join us

पालिका शाळांमध्ये स्काऊट- गाइड अनिवार्य करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 01:13 IST

शिक्षण समिती अध्यक्ष : कसरतीचे देणार धडे

मुंबई : पालिका शाळांमध्ये लवकरच स्काऊट गाइड अनिवार्य करून विद्यार्थ्यांना शिस्त, व्यायाम, कसरतीचे धडे देण्याचा निर्धार शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक यांनी केला आहे. भविष्यात विद्यार्थ्यांना स्काऊट गाइडचा मोठा उपयोग होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.भारत स्काऊट आणि गाइड उत्तर व दक्षिण मुंबई, जिल्हा प्रशिक्षण केंद्र, पवई-फिल्टर पाडा येथे महापालिकेमार्फत आयोजित पाहणी दौऱ्यात त्या बोलत होत्या. पालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आगामी काळात भर देणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

अभ्यासेतर उपक्रमात सहभाग घेतल्यास विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचा आरोप त्यांनी खोडून काढला. पालिका शाळांमधील शेकडो विद्यार्थी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करीत असल्याचे दाखले त्यांनी या वेळी दिले. शांततेचे प्रतीक असलेले कबुतर आणि फुगे हवेत सोडून संपूर्ण प्रशिक्षण केंद्रातील कसरतींच्या साधनांचा आढावा घेण्यात आला.

साहसी खेळांचेही प्रशिक्षणपालिका शाळांमधील १८ ते २५ विद्यार्थ्यांचे गट पवई येथील प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणासाठी येत असतात. या ठिकाणी व्यायाम, कसरती, साहसी खेळांबरोबरच आपत्कालीन परिस्थितीशी लढण्याचे प्रशिक्षण विद्यार्थी व शिक्षकांनाही देण्यात येते. पालिकेच्या प्रत्येक विद्यार्थ्याला अशा साहसी खेळाचे प्रशिक्षण मिळायला हवे यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे विधि समिती अध्यक्षा शीतल म्हात्रे यांनी सांगितले.

टॅग्स :मुंबई महानगरपालिका