Join us

पालिका शाळा होणार डिजिटली स्मार्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:26 IST

विद्यार्थ्यांसाठी टिंकरिंग लॅब, व्हर्च्युअल क्लासरूम : यू ट्युब वाहिनीसाठी अर्थसंकल्पात तरतुदीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पालिकेच्या शिक्षण विभागाने ...

विद्यार्थ्यांसाठी टिंकरिंग लॅब, व्हर्च्युअल क्लासरूम : यू ट्युब वाहिनीसाठी अर्थसंकल्पात तरतुदी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पालिकेच्या शिक्षण विभागाने २०२०-२१ या वर्षासाठी २९४५.७८ कोटींचा शैक्षणिक अंदाजित अर्थसंकल्प सादर केला. मागील वर्षीचा अर्थसंकल्प २९४४.५९ कोटी रुपयांचा आणि १०२.१३ कोटी रुपये शिलकीचा होता. मात्र गतवर्षीच्या तुलनेत यंदाचा अर्थसंकल्प हा १.१९ कोटी रुपयांनी जास्त आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदीनुसार लवकरच मुंबई महापालिकेच्या शाळांचे नाव आणि त्यांचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न यामधून केला जाईल.

मुंबई महापालिकेच्या स्वतःच्या मालकीच्या एकूण ४६७ शालेय इमारती आहेत. यापैकी बऱ्याच शालेय इमारतींची कामे प्रगतिपथावर आहेत. मुंबईतील नागरिकांच्या मनात महानगरपालिका शाळांच्या रंगाविषयी एक विशिष्ट ओळख प्राप्त व्हावी, याकरिता शाळा पायाभूत सुविधा कक्षामार्फत दुरुस्तीसह दर्जा सुधारण्यासाठी शाळांची रंगरंगोटीची कामे सुरू असून, शैक्षणिक गुणवत्ता आणि दर्जा सुधारण्यासाठी पायाभूत भौतिक सेवा सुविधेत प्राथमिक अर्थसंकल्पीय तरतूदही १९०. ०१ कोटी रुपये करण्यात आली आहे. शाळा पायाभूत सुविधा कक्षामार्फत २० मैदानांचा विकास टप्प्याटप्प्याने पुढील वर्षात करण्यात येणार असून त्यासाठी ५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.

महानगरपालिकेच्या शाळांबद्दल जनतेच्या मनात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी पालिकेच्या शाळांचे ‘मुंबई पब्लिक स्कूल’ असे नामकरण करण्यात येईल. यामध्ये प्राथमिक विभागाच्या ९६३ आणि माध्यमिक विभागाच्या २२४ मनपा शाळांना मूळ नावासह मुंबई पब्लिक स्कूल (एमपीएस) असे संबोधण्यात येईल. एमपीएसकरिता नव्या लोगोची निर्मितीही करण्यात येईल.

पालिकेच्या शाळांमधील १३०० वर्ग खोल्या एलईडी इंटरॅक्टिव्ह पॅनलद्वारे डिजिटल क्लास रूममार्फत विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे अध्ययन व अध्यापन प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी विशेष तरतूद या अर्थसंकल्पात आहे. याकरिता डिजिटल क्लासरूमची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. यामध्ये प्रथमिकसाठी २३.५८ कोटी तर माध्यमिकसाठी ५ कोटींची तरतूद आहे. सद्य:स्थितीत मराठी, हिंदी, उर्दू आणि इंग्रजी या ४ माध्यमांच्या एकूण ४८० शाळांमध्ये ३६० प्राथमिक, १२० माध्यमिक शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरूम पद्धतीने शिक्षण सुरू करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या डिजिटल पद्धतीच्या शिक्षणासाठी १ली ते १०वीच्या विद्यार्थ्यांसाठी ४० यू ट्युब वाहिनीच्या माध्यमातून ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे. त्यासाठी प्राथमिक शाळांसाठी ८.०५ कोटी, तर माध्यमिकसाठी ५.१० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

* २.६५ कोटींची तरतूद

पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी २५ माध्यमिक शाळांमध्ये विचारशील प्रयोगशाळा म्हणजेच टिंकरिंग लॅबसाठी प्राथमिक व माध्यमिकसाठी प्रत्येकी २.६५ कोटींची तरतूद आहे. त्याचप्रमाणे, धोकादायक शालेय इमारतींची दुरुस्ती करणे, मुख्याध्यापक अधिकाराचे विकेंद्रीकरण, माध्यमिक शालान्त परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आर्थिक मदत आदी बाबींसाठी निधीची भरीव तरतूद करण्यात आली आहे.

--------------------