भिवंडी : महानगरपालिका प्रशासन व नगरसेवकांच्या दुर्लक्षाने शहरांतील रहिवासींना मनपाच्या आरोग्य केंद्रातून नियमीत व योग्य सेवा मिळत नसल्याने रूग्णांना स्व. इंदिरा गांधी स्मृती रूग्णालयावर अवलंबून रहावे लागत आहे. महानगरपालिकेची शहरांत चौदा आरोग्य केंद्रे असून त्यामध्ये कुटुंब कल्याणाच्या निर्देशानुसार डॉक्टर व नर्स मार्फत महिला व बालकांना आरोग्य सुविधा पुरविल्या जातात. काही आरोग्य केंद्रात एमबीबीएस डॉक्टर नसल्याने पुरूष तेथे औषधे घेण्यास जात नाही. पालिकेच्या आरोग्य केंद्रात बाह्यरुग्ण विभाग सुरू करावा व प्रसूतीगृह सुरू करावे, अशी मागणी असताना प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. या दोन्ही सुविधा उपलब्ध केल्यास मनपास उत्पन्नाच्या बाजू निर्माण होऊन शहरांतील बोगस डॉक्टरांना आळा बसेल. १३हजार लोकसंख्येसाठी एक आरोग्य केंद्र असावे असे शासनाचे निर्देश असल्याने तीन वार्डासाठी एक आरोग्य केंद्र असे मनपाच्या ९० वार्डासाठी ३० आरोग्य केंद्रे अपेक्षीत आहेत. परंतु गेल्या काही वर्षापासून केवळ १२ ते १४ केंद्रे मनपाच्या आरोग्य विभागाने सुरू केली आहेत. सात लाख लोकसंख्येच्या या महानगरपालिकेचे एकही प्रसूतीगृह नाही. इदगाह रोड केंद्र प्रभूआळीत तर नदीनाका केंद्र इंदिरागांधी रूग्णालयाजवळ आहे. या आरोग्य केंद्रावर फलक व परिसरांत दिशादर्शक फलक नसल्याने रूग्ण आरोग्य केंद्रापर्यत पोहोचत नाही.त्यामुळे नर्सेस व डॉक्टर परिसरांत जाऊन रूग्णांना उपचार, लसीकरण उपक्रम राबवितात. क्षयरोग समितीमार्फत प्रत्येक केंद्रात रक्त तपासणीची प्रयोग शाळा अपेक्षीत असताना काही ठिकाणी प्रयोगशाळा नाहीत. त्या प्रयोगशाळेत कमी किमतीत इतर रूग्णांची व मधुमेही रूग्णांची रक्त तपासणी शक्य होऊ शकते. मुंबई कायद्यानुसार मालमत्ताधारकासह शहरवासीयांना महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून आरोग्य सेवा देण्याचे निर्देश असताना मनपा आरोग्य अधिकारी व प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. (प्रतिनिधी)
मनपा आरोग्य केंद्र बिनकामाचे
By admin | Updated: February 24, 2015 22:30 IST