लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मालाडमधील एस व्ही रोडच्या रुंदीकरणात गेली ५० वर्षे अडथळा बनलेल्या १३ दुकानांवर अखेर मंगळवारी हातोडा मारण्यात आला. ही कारवाई होणार असल्याबाबत 'लोकमत'ने २९ ऑगस्ट रोजी वृत्त प्रकाशित केले होते. त्यानुसार पी उत्तरचे सहायक आयुक्त मकरंद दगडखैर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
मालाड पश्चिम येथील एस व्ही रोडवर असलेल्या मन मंदिर दुकानासह एकूण १३ स्ट्रक्चरवर ही तोडक कारवाई करण्यात आली आहे. त्यातील दोन दुकाने २८ ऑगस्ट रोजी तोडण्यात आली, तर उरलेली ११ दुकाने येत्या दहा दिवसांत पालिकेकडून निष्काशित करण्यात येतील, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. मात्र, दरम्यान गणेशोत्सव असल्याने काही काळ ही कारवाई थांबविण्यात आली होती. या दुकानदारांना २ हजारच्या बॉटल नेक पॉलिसीनुसार त्याच स्ट्रक्चरच्या मागे ५० टक्के बांधकाम करण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र, गेल्या चार वर्षांपासून दुकानदार स्थलांतरित झाले नव्हते. अखेर पी/उत्तर विभागाने त्यांना नोटीस देत स्थलांतर करण्यास सांगून ही कारवाई हाती घेतली.
वाहतुकीची कोंडी कमी होईल
गेल्या ५० वर्षांपासून हा प्रकल्प होता. त्यानुसार कार्यकारी अभियंता राजेश अक्रे यांच्या नेतृत्वाखाली आमच्या पथकाने एकुण १३ दुकानांवर कारवाई करत रस्ता मोकळा करून दिला. ज्यामुळे वाहतुकीची कोंडी कमी होण्यास साहाय्य होणार आहे.
मकरंद दगडखैर - सहायक आयुक्त, पी उत्तर विभाग