Join us
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यू, मलेरियावर महापालिकेचे ड्रोनास्त्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 01:03 IST

डासांचे अड्डे शोधण्यास सुरुवात; दाटीवाटीच्या लोकवस्तीमध्ये फवारणी

मुंबई : मलेरिया आणि डेंग्यूच्या डासांच्या अळ्या नष्ट करण्याची मोहीम महापालिकेमार्फत सुरू आहे. मात्र दक्षिण मध्य मुंबईतील बंद गिरणी आणि दाटी वाटीच्या लोकवस्तीत या डासांचे अड्डे शोधण्यात अडचणी येत असतात. त्यामुळे ड्रोन कॅमेराच्या साहाय्याने या डासांची उत्पत्तीस्थाने शोधण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे. त्याचबरोबर आता या परिसरांमध्ये ड्रोनद्वारे कीटकनाशक फवारणी केली जाणार आहे. तुंबलेल्या पाण्यात मलेरिया, डेंग्यू डासांची उत्पत्ती होत असते. अशा डासांच्या अळ्या नष्ट करण्यासाठी महापालिकेच्या कीटकनाशक विभागाने जानेवारीपासून मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत प्रत्येक विभागात पाणी साचणाऱ्या टायर पासून अन्य वस्तूपर्यंत सर्व नष्ट करण्यात आले आहे. मात्र बंद गिरण्या, दाटी वाटीची लोकवस्तीमध्ये डासांच्या अळ्या शोधणे आव्हानात्मक ठरत आहे. यासाठी ड्रॉनचा वापर केला जाणार आहे. जी-दक्षिण म्हणजेच वरळी, प्रभादेवी या विभागापासून या उपक्रमाची सुरुवात होणार आहे.या विभागातील उपाय योजनांचा आढावा महापौर किशोरी पेडणेकर यांनी सोमवारी घेतला. यावेळी डेंग्यू-मलेरियाची उत्पत्तीस्थाने ड्रोन कॅर्मे­याने शोधून या ठिकाणी किटकनाशक फवारणी करणार असल्याची माहिती जी दक्षिण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. गेल्यावर्षी डेंग्यू-मलेरियाचे डास सापडलेल्या ठिकाणी खबरदारी घेण्याची सूचना महापौरांनी केली.येथे होणार ड्रोनचा वापरवरळी, लोअर परळ विशेषत: दक्षिण मध्य भागात काही गिरण्या अनेक वर्षांपासून बंद आहेत. या जागेत पाणी साचून राहिल्यास डासांची उत्पत्ती होते. मुंबईतील उंच इमारती, झोपडपट्ट्यांवर असणाºया ताडपत्री, रेल्वे रूफ, मोनो रेल अशा ठिकाणी कामगार पोहोचून कीटकनाशक फवारणी करू शकत नाहीत. त्यामुळे ड्रोनद्वारे कीटकनाशक फवारणी करण्यात येणार आहे. आपत्कालीन स्थिती, आग, पाणी साचणे किंवा कुठल्याही प्रकारच्या दुर्घटनेत ड्रोनच्या माध्यमातून बचावकार्य केले जात आहे. पाणी साचून राहिलेल्या वस्तूंमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाडेंग्यू