नामदेव मोरे, नवी मुंबईऐतिहासिक निर्णय असा उल्लेख केलेली महापालिकेची स्वस्त पाणी योजना पूर्णपणे फसली आहे. सद्यस्थितीमध्ये शहरातील फक्त १३ टक्के नागरिकांना या योजनेचा लाभ होत आहे. तब्बल ८७ टक्के ग्राहकांची पाच वर्षांत फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ही योजना वैयक्तिक नळजोडणीधारकांसाठीच लागू असून गृहनिर्माण सोसायटीमधील रहिवाशांचीही उपेक्षा करण्यात आली. नवी मुंबई महानगरपालिकेने ८ फेब्रुवारी २०१० मध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये स्वस्त पाणी योजनेचा ठराव आणला होता. ५० रुपयांमध्ये ३० हजार लिटर पाणी देण्याचा निर्णय सर्वमताने मंजूर करण्यात आला. ऐतिहासिक निर्णय व जगात सर्वात स्वस्त पाणी देणारी महापालिका म्हणून प्रशासनासह सत्ताधाऱ्यांनी पाठ थोपटून घेतली होती. निर्णय जाहीर होताच राजकीय पदाधिकाऱ्यांनी शहरात सर्वत्र होर्डिंग लावून त्याचे स्वागत केले होते. या प्रस्तावावर जवळपास तीन तास चर्चा झाली होती. पालिकेने ३० हजार लिटरपर्यंत ५० रुपये व त्यापुढे वापर झाल्यास सरसकट ४.७५ रुपये दराने बिल आकारण्याचा प्रस्ताव आणला होता. परंतु तत्कालीन सभागृह नेते जयवंत सुतार यांनी ३० हजार लिटरपर्यंत ५० रुपये व त्यापुढे वापर केल्यास फक्त वाढीव वापरासच ४.७५ रुपये दर आकारण्यात यावा अशी उपसूचना मांडली होती. डॉ. जयाजी नाथ यांनी अनुमोदन दिले होते. या ठरावास पाच वर्षे झाली आहेत. परंतु अद्याप त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी झालेली नाही. शहरातील फक्त वैयक्तिक नळजोडणीधारकांसाठीच ही योजना राबविली जात आहे. गृहनिर्माण सोसायट्यांना त्यामधून वगळण्यात आले आहे. याशिवाय ३० लिटरपेक्षा एक लिटर पाणी जास्त वापरले तरी सरसकट ४.७५ रुपये बिल आकारले जात आहे. पाच वर्षांत किती नागरिकांना स्वस्त पाणी योजनेचा लाभ झाला याविषयी माहिती अधिकाराचा वापर करून माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला असता प्रशासनाने फक्त एक महिन्याचाच तपशील दिला आहे. आॅगस्ट व सप्टेंबर २०१४ या महिन्यात ३१,८५० ग्राहकांना ५० रुपये बिल आकारण्यात आल्याची माहिती दिली आहे. शहरात १ लाख २२ हजार नळजोडणीधारक आहेत. या माहितीप्रमाणे २६ टक्के ग्राहकांना स्वस्त पाणी योजनेचा लाभ झाला व ७४ टक्के ग्राहकांना त्याचा काहीही उपयोग झाला नाही. शहराची लोकसंख्या साडेबारा लाख आहे. लाभ झालेल्या प्रत्येक ग्राहकाच्या कुटुंबात ५ व्यक्ती असल्याचे गृहीत धरले तरी फक्त १३ टक्के नागरिकांना याचा लाभ झाला आहे. ८७ टक्के लोकसंख्येची स्वस्त पाणी योजनेच्या नावाखाली पूर्णपणे फसवणूक झाली आहे. या सर्व नागरिकांना जादा दराने पाणी बिल भरावे लागत असून नागरिकांची पूर्णपणे फसवणूक झाली आहे.
पालिकेची स्वस्त पाणी योजना फसली
By admin | Updated: January 29, 2015 01:59 IST