Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्पुतनिक लस मिळवण्याचे महापालिकेचे प्रयत्न निष्फळ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:06 IST

डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजबरोबर दोन महिन्यांपासून चर्चाचशेफाली परब पंडितमुंबई : खासगी रुग्णालयांमध्ये अखेर मंगळवारपासून स्पुतनिक लस देण्यास सुरुवात ...

डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजबरोबर दोन महिन्यांपासून चर्चाच

शेफाली परब पंडित

मुंबई : खासगी रुग्णालयांमध्ये अखेर मंगळवारपासून स्पुतनिक लस देण्यास सुरुवात झाली. मात्र ही लस मिळविण्यासाठी मुंबई महापालिका अद्याप चाचपडत आहे. या रशियन लसीचे वितरक डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांच्याबरोबर जवळपास दोन महिने चर्चा सुरू आहे. परंतु, अद्याप स्पुतनिक लसींचा साठा मिळविण्यात पालिका प्रशासनाला यश आलेले नाही.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असल्याने संपूर्ण मुंबईकरांचे लसीकरण करून घेण्याचे लक्ष्य महापालिकेने ठेवले आहे. त्यानुसार मे महिन्यात एक कोटी लस खरेदीसाठी जागतिक स्तरावर निविदा मागविण्यात आल्या होत्या. मात्र बहुतांश स्पुतनिक लसीचा पुरवठा करण्याची तयारी दाखवत पुढे आलेले आठही पुरवठादार अपात्र ठरले. त्यानंतर महापालिकेने स्पुतनिक लसीसाठी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजबरोबर चर्चा सुरू केली.

या चर्चेनुसार प्रायोगिक तत्त्वावर स्पुतनिक लसीचा साठा जून अखेरीपासून मिळण्यास सुरुवात होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला होता. या लसीचा साठा मिळाल्यानंतर त्याच्या शीतगृहातील साठवणुकीची चाचपणी पालिका करणार होती. तसेच जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांमध्ये लसीचा साठा मोठ्या प्रमाणात देण्याबाबतही विचारणा करण्यात आली होती. प्रत्यक्षात दोन महिन्यांच्या चर्चेनंतरही ही लस मिळण्याची कोणतीही चिन्हे नाहीत.

लसींच्या अपुऱ्या साठ्याचा मोहिमेला फटका

मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. आतापर्यंत ४८ लाख २९ हजार नागरिकांनी पहिला डोस तर १३ लाख ३९ हजार नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. गेल्या आठवड्यात लस संपल्याने तीन दिवस पालिका आणि सरकारी केंद्रातील लसीकरण बंद होते. मंगळवारी ४५ हजार कोविशिल्ड लसींचा साठा पालिकेला प्राप्त झाला आहे. लवकरच आणखी काही साठा उपलब्ध होईल, असा विश्वास पालिका अधिकारी व्यक्त करीत आहे.

आतापर्यंत मिळालेली लस (पालिका, सरकारी)

कोविशिल्ड - ३३,७१, ९४७

कोवॅक्सिन - १,९२,०७७

स्पुतनिक - दोनशे (खासगी रुग्णालय)

केंद्र सरकारच्या धोरणानुसार ७५ टक्के लसींची खरेदी केंद्रामार्फतच होत आहे. डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजबरोबरील चर्चा थांबलेली नाही.

- सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महापालिका