लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईतील शाळा सुरू करण्याआधी शासनाच्या निर्देशानुसार शाळांमध्ये हॅन्डसॅनिटायझर, थर्मोमीटर, पल्स ऑक्सिमीटर, हँडवॉश / साबण अशा सुविधा व साहित्य पुरविले जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी मास्कची तरतूदही यात करण्यात आली आहे. या सुविधांसाठी महापालिका अर्थसंकल्पात १५.९० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना या सुविधा पुरविताना मास्क दिले जाणार आहेत, मात्र सॅनिटायझरसारखे द्रव्य संवेदनशीलपणे हाताळणे आवश्यक असल्याने विद्यार्थ्यांना त्यांचा पुरवठा करण्यात येणार नसून तो शाळांना करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
यासोबत महापालिकेकडून विद्यार्थ्यांना विज्ञानातील कठीण संकल्पनांचे आकलन व्हावे यासाठी विज्ञान प्रतिकृतींची निर्मिती ही विज्ञान कुतूहल भवनामध्ये केली जात आहे. एकूण १२३ प्रतिकृती निर्माण करण्यात येत असून हरियाली व्हिलेज विक्रोळी येथे ६२, तर विलेपार्ले पूर्व येथील शाळेत ६१ वैज्ञानिक प्रतिकृती या शिक्षकांमार्फत तयार करण्यात येत आहेत. सन २०२०-२१ या वर्षात विज्ञान कुतूहल भवन येथे प्रतिकृती नूतनीकरणाचे काम सुरू असून आरोग्य दालन आरसे, विज्ञान दालन, आरसे महल, खगोल दालन या सर्व प्रतिकृतींचे शिक्षकांमार्फत नवनिर्मितीचे काम सुरू आहे. महानगरपालिकेतर्फे सुरू करण्यात आलेल्या सीबीएसई बोर्डाच्या शाळांना शैक्षणिक वर्ष २०-२१ मध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळेच नवीन सीबीएससी बोर्डाच्या दहा शाळा मुंबईत सुरू करण्यात येणार असून त्यासाठी २ कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
बालवाडीच्या सक्षमीकरणासाठी २०२१ मध्ये शिक्षकांसाठी २ दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला असून, पुढील २ प्रशिक्षण मार्च २०२१ मध्ये घेण्यात येणार आहेत. त्याचसोबत २७९ मराठी माध्यमाच्या बालवाडी वर्गांमध्ये ६ महिन्यांसाठी रॉकेट लर्निंग व आकांक्षा फाउंडेशन या एनजीओमार्फत प्रायोगिक तत्त्वावर प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यावर विद्यार्थ्यांची पुढील शिक्षणाची गैरसोय होत असल्याने भविष्यात शक्य होईल तेथे १० वीचे वर्ग महापालिकेमार्फत शाळांत वाढविण्यात येणार असून २४ माध्यमिक शाळा सुरू करण्याचा महापालिकेचा मानस आहे.