Join us  

महापालिका ५० कोटी खड्ड्यांत घालणार; मॅस्टिक अस्फाल्टचा करणार वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 10:08 AM

मुंबईत पालिकेच्या अखत्यारित सुमारे दोन हजार किमीचे रस्ते आहेत. या रस्त्यांवर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडत असल्याने अनेकदा टीकेला सामोरे जावे लागते.

मुंबई : पावसाळापूर्व मुंबई महापालिकेने कामे हाती घेतली आहेत. याचाच एक भाग म्हणून पश्चिम उपनगरातील ९ मीटरपेक्षा जास्त आणि कमी रुंद असलेल्या विविध रस्त्यांवर पावसाळ्यापूर्वी, पावसाळ्यात आणि पावसाळ्यानंतर मॅस्टिक अस्फाल्टचा वापर करून खड्डे बुजविण्यात येणार आहेत. यासाठी ५० कोटींची निविदा महापालिकेने काढली आहे.

मुंबईत पालिकेच्या अखत्यारित सुमारे दोन हजार किमीचे रस्ते आहेत. या रस्त्यांवर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडत असल्याने अनेकदा टीकेला सामोरे जावे लागते. त्यामुळे खड्डेमुक्त रस्त्यांसाठी काँक्रिटीकरण करण्याचे धोरण राबवण्यात येत आहे. 

पावसाळा अवघ्या दोन महिन्यांवर आला असताना शहरातील रस्तेकामासाठी कंत्राटदारच मिळत नसल्याची स्थिती आहे, तर पूर्व-पश्चिम उपनगरातील रस्त्यांची फक्त २० टक्केच कामे झाली आहेत. त्यामुळे शिल्लक दोन महिन्यांत रस्त्यांची कामे पूर्ण कशी होणार, असा प्रश्न निर्माण झाला असल्यामुळे मुंबईकरांचा पावसाळा यावर्षी खड्ड्यात जाण्याची स्थिती आहे. 

मात्र, मुंबईकरांना दिलासा म्हणून पालिका अत्याधुनिक तंत्रज्ञानाने किमान खड्डे बुजवण्याचे काम हाती घेत आहे. 

१) १० कोटी : एच पूर्व/एच पश्चिम/के पूर्व मधील ९ मीटरपेक्षा जास्त रुंदीचे रस्ते  

२)  १.५० कोटी : एच पूर्व/एच पश्चिम / के पूर्व मधील ९ मीटरपेक्षा कमी रुंदीचे रस्ते 

३) २३ कोटी : के पश्चिम/ के उत्तर / के दक्षिण मधील ९ मीटरपेक्षा जास्त रुंदीचे रस्ते 

४) १५ कोटी : के पश्चिम/ के उत्तर / के दक्षिण मधील ९ मीटरपेक्षा कमी रुंदीचे रस्ते 

अशा प्रकारे होतो वापर-

मुंबईतील रस्त्यांची पावसाळ्याआधी दुरुस्ती, खड्डे बुजवण्याचे काम करताना केवळ खड्डे न बुजवता जास्तीत जास्त मास्टिक सरफेस तंत्रज्ञानाने रस्त्यांची दुरुस्ती केली जाणार आहे. यामध्ये केवळ खड्डा न बुजवता संपूर्ण रस्त्याची सरफेस मास्टिक पद्धतीने दुरुस्ती करण्यात येईल. मास्टिक डांबरीकरणात १८० ते २०० अंश डिग्री सेल्सिअस तापमान असते. ते सर्वांत जलद गतीने स्थिर होते. त्यामुळे अपयशी ठरलेल्यामुळे कोल्डमिस्कऐवजी मास्टिक अस्फाल्टचा वापर करण्यात येणार आहे.

टॅग्स :मुंबईनगर पालिकारस्ते सुरक्षा