मुंबई : सायन-माहीम लिंक रोडवरील उड्डाणपुलाचा काही भाग खचून चार वर्षे लोटली तरी या पुलाच्या दुरुस्तीकडे महापालिकेने कानाडोळा केला आहे. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागत आहे. महापालिकेकडे पाठपुरावा केल्यानंतरही पुलाचे काम मार्गी लागत नसल्याने काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी याबाबत न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.धारावीतील केमकर चौकाजवळील सायन-माहीम लिंक रोडवरील ६0 फूट नाल्यावर असलेल्या उड्डाणपुलाचा काही भाग ६ आॅगस्ट २0११ रोजी खचला. या घटनेत दोन वाहने खड्ड्यात पडली. अद्यापपर्यंत या उड्डाणपुलाचे काम सुरू झालेले नाही. त्यामुळे या उड्डाणपुलावरील उत्तरेकडील भागावरून जाणारी वाहतूक बंद करून ती दक्षिणेकडील भागावरून वळविण्यात आली आहे. त्यामुळे माहीम खाडीच्या जवळील बाजूने होणारी वाहतूक बंद झाली आहे. उड्डाणपुलावरील वाहतूक एका दिशेने बंद केल्याने या मार्गावर वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. तसेच बंद केलेल्या मार्गावर स्थानिकांकडून वाहने उभी करण्यात येत आहेत. माहीम आणि सायन बीकेसीकडे जाण्यासाठी हा मार्ग सोईचा असल्याने अनेक वाहने या मार्गावरून जातात. परंतु येथे वाहतूक कोंडी होऊ लागल्याने १० मिनिटांच्या प्रवासासाठी तब्बल एक तासाचा कालावधी लागत आहे. (प्रतिनिधी)
धारावीतील उड्डाणपुलाकडे पालिकेचे दुर्लक्ष
By admin | Updated: September 19, 2015 23:19 IST