Join us

जलवाहिनी फुटल्याप्रकरणी मेट्रोला आकारलेल्या दंडातून नागरिकांना नुकसान भरपाई द्या, पालिका आयुक्तांकडे मागणी

By मनोहर कुंभेजकर | Updated: December 7, 2023 15:26 IST

Mumbai Municipal Corporation: मुंबई मेट्रोच्या कामासाठी ड्रिलिंगचे काम सुरु असताना, अंधेरीतील वेरावली  सेवा जलाशयाच्या मुख्य जलवाहिनीला हानी पोहोचून गळती लागली. त्याच्या परिणामी मुंबईतील काही भागात पाणीपुरवठा खंडीत झाला होता.

- मनोहर कुंभेजकरमुंबई  - मुंबई मेट्रोच्या कामासाठी ड्रिलिंगचे काम सुरु असताना, अंधेरीतील वेरावली  सेवा जलाशयाच्या मुख्य जलवाहिनीला हानी पोहोचून गळती लागली. त्याच्या परिणामी मुंबईतील काही भागात पाणीपुरवठा खंडीत झाला होता. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने मेट्रोला आकारलेल्या दंडातून नागरिकांना झालेल्या आर्थिक, मानसिक, शारीरिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भाजपाचे माजी नगरसेवक पंकज यादव यांनी मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याकडे केली आहे.

मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे अंधेरी, विलेपार्ले, जोगेश्वरी, मालाड, वांद्रे तसेच घाटकोपर, चांदिवली, कुर्ला, भांडुप आदी परिसरात पाणीबाणी परिस्थिती निर्माण झाली. या भागात टॅकरने पाणीपुरवठा करण्यात आला. त्यामुळे असंख्य सोसायटीमधील रहिवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. अखेर ५० तासांच्या कामानंतर जलवाहिनी दुरुस्ती झाली आणि हळुहळू  पाणी पुरवठा सुरळीत होत आहे. मेट्रोच्या कामांत जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. पाच वॉर्डातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात मानसिक, शारीरिक त्रास सहन करावा लागला. त्याचीच नुकसान भरपाई म्हणून मुंबई  महानगरपालिकेने मेट्रोला आकारलेल्या १ कोटी ३३ लाख ६२ हजार ४१२ रुपयांच्या दंडातून नागरिकांना द्यावी अशी मागणी पंकज यादव यांनी आयुक्तांकडे केली आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकामुंबई