Join us
Daily Top 2Weekly Top 5

पालिका प्रशासनाची लसीकरणाविषयी तयारी अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ज्येष्ठांना लस देण्याची प्रक्रिया सुरू होईल. यासाठी येत्या १ मार्चपासून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ज्येष्ठांना लस देण्याची प्रक्रिया सुरू होईल. यासाठी येत्या १ मार्चपासून को-विन ॲप नागरिकांच्या सुविधेसाठी खुले होणार आहे. याकरिता केंद्र शासनाने शहर-उपनगरातील काही खासगी व पालिका-सरकारी रुग्णालयांची नियुक्ती केली आहे, मात्र राज्य वा स्थानिक पातळीवर या रुग्णालयांत लस व्यवस्थापनाविषयी निकषांची पूर्तता झाल्यानंतर लसीकरण प्रक्रिया सुरू कऱण्यात येईल अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.

सध्या लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि कोरोना योद्ध्यांचे लसीकरण सुरू आहे. भारतात मार्च महिन्यातच कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होऊ शकते. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील व्यक्तींना लस दिली जाणार आहे. सोबतच ४५ ते ५९ वर्षांच्या परंतु, गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्तींनाही कोरोना लस दिली जाणार आहे.

केंद्र सरकार, राज्य आणि मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. या बैठकीत तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाबाबत चर्चा करण्यात आली. खासगी रुग्णालयांना लसीकरण करण्यास परवानगी देण्याबाबतची चाचपणी करण्याचे आदेश आरोग्य विभागाला देण्यात आले आहेत. खासगी रुग्णालयाची लसीकरणाची क्षमता, रुग्णालयात किती लसीच्या साठवणुकीची क्षमता आहे याचा आढावा घेण्यास सांगण्यात आले आहे. खासगी रुग्णालयांचा आढावा घेण्यास आणखी आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागणार आहे. लसीकरण करण्यासाठी खासगी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

महापालिका प्रशासनाच्या वतीने तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी युद्धपातळीवर हालचाली सुरू आहेत. मात्र केंद्राकडून मार्गदर्शक तत्त्वांची यादी असल्यास त्यानंतर पालिकेकडून अंमलबजावणीला वेग येईल, तूर्तास केंद्राकडून निश्चित करण्यात आलेल्या रुग्णालयांमध्ये लसीकरणाविषयी सर्व निकष पाळण्यात येतात का, याची पडताळणी कऱण्यात येणार आहे. शिवाय, लसीकरणाविषयी जनजागृती मोहीम, मनुष्यबळास प्रशिक्षणही देण्यात येईल, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

चौकट

ही आहे नोंदणी प्रक्रिया

- तुमच्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींना लसीकरणाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य सेतू ॲपद्वारे कोविन वेबसाइटवर तुम्ही नोंदणी करू शकता.

- कोविन किंवा आरोग्य सेतू हे वेगळे ॲप डाऊनलोड करण्याचीही गरज नाही. जर तुमच्याकडे हे मोबाइल ॲप्लिकेशन्स नसतील तर तुम्ही थेट COWIN.GOV.IN या वेबसाइटवर जाऊन लसीकरणासाठी तुमच्या अथवा तुमच्या कुटुंबातील ज्येष्ठांच्या नावांची नोंदणी करू शकाल.

- नोंदणी करताना काही माहिती वेबसाइटवर भरावी लागेल. नाव, वय, लिंग याचा यात समावेश असेल. मात्र बायोमेट्रिक डाटाचा यात समावेश नाही.

नोंदणीसाठी काय कराल?

- ४५ ते ६० वयोगटातील ज्या व्यक्ती गंभीर आजाराने त्रस्त आहेत त्यांना नोंदणीसाठी मेडिकल सर्टिफिकेटची आवश्यकता राहील. हे सर्टिफिकेट कोणत्याही रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर (डॉक्टर)कडून प्रमाणित असणे आवश्यक आहे.

- गंभीर आजारांमध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, मूत्रपिंड आणि फुप्फुसांशी संबंधित २० गंभीर आजारांचा (को-मॉर्बिडिटीज) समावेश आहे.

कोणती लस घ्यायची, हा पर्याय मिळणार?

पालिका प्रशासनाच्या माहितीनुसार, लसीकरणासाठी नाव नोंदविणारा व्यक्ती आपल्याला कोविशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन यापैकी कोणती लस घ्यायची याची निवड करू शकणार नाही. लसीकरण केंद्रावर जी लस उपलब्ध असेल ती लस नागरिकांना घ्यावी लागेल.

पालिका

शताब्दी रुग्णालय

खासगी रुग्णालयांची यादी

मुस्लीम एम्ब्युलन्स डायलिसिस सेंटर (शहर)

साबू सिद्दीक मॅटर्निटी होम अँड हॉस्पिटल (शहर)

लालबाग राजा डायलिसिस सेंटर (शहर)

लायन ताराचंद बापा रुग्णालय (शहर)

के.जे. सोमय्या रुग्णालय आणि रिसर्च सेंटर (उपनगर)

एसआरसीसी रुग्णालय (शहर)

नाना पालकर स्मृती समिती डायलिसिस केंद्र (शहर)

लायन कार्टर सिंग रुग्णालय (नवरंग सिनेमा जवळ, अंधेरी)

ब्रह्मकुमारी रुग्णालय (उपनगर)

लाइफलाइन मेडिकेअर रुग्णालय (एस.व्ही. एमटीएनएल गोरेगाव)

व्हीनस चॅरिटेबल मेडिकल सेंटर (उन्नत नगर गोरेगाव)

प्रबोधन चॅरिटेबल डायलिसिस सेंटर (सीएसटी १७५, व्हीलेज रोड, विश्वेश्वर रोड)

काॅस्मोपोलिटीयन चॅरिटेबल डायलिसिस अँड डेकेअर सेंटर (उपनगर)

श्री नमिनाथ जैन फाऊंडेशन (बोरीवली)

शुश्रुत रुग्णालय (चेंबूर)

पारख रुग्णालय (खोकाणी लेन, स्टेशन रोड, घाटकोपर)

डॉ. मीना मल्टिस्पेशालिटी रुग्णालय (भांडुप)

प्लॅटीनम रुग्णालय (मुलुंड)

एच.जे. दोषी घाटकोपर हिंदू सभा रुग्णालय (घाटकोपर)

शिवम रुग्णालय (आनंद नगर, दहिसर पूर्व)

राणे रुग्णालय (३७, पेस्टोन नगर, चेंबूर)

एपेक्स रुग्णालय (ए विंग, वैशाली हाइट्स)

लॅन्सलेट डायलिसिस केंद्र (शहर)

मलिका रुग्णालय (जोगेश्वरी)

श्री बालाजी सुपर स्पेशालिटी रुग्णालय (राणी सती मार्ग, पासपोर्ट रुग्णालय, मालाड)

श्री नाथ जैन फाऊंडेशन (मालाड)

एससीजी मनवता प्रा. लि. मुंबई नाका