Join us

मुंब्रा : मतांच्या विभाजनामुळे कळव्याला महत्त्व

By admin | Updated: October 5, 2014 23:57 IST

आघाडी तुटल्याने यंदा कळवा-मुंब्रा मतदारसंघात (१४९) राष्ट्रवादीचे उमेदवार जितेंद्र आव्हाडांपुढे कडवे आव्हान आहे.

अजित मांडके, ठाणेआघाडी तुटल्याने यंदा कळवा-मुंब्रा मतदारसंघात (१४९) राष्ट्रवादीचे उमेदवार जितेंद्र आव्हाडांपुढे कडवे आव्हान आहे. त्यात सर्वपक्षीयांच्या चक्रव्यूहाचाही सामना त्यांना करावा लागत असल्याने त्यांची तारेवरची कसरत सुरू झाली आहे. विशेष म्हणजे एमआयएम, सपा आणि काँग्रेसच्या उमेदवारामुळे मुंब्य्रातील मतांचे विभाजन होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाल्याने आता आव्हाडांची मदार कळव्यातील मतदारांवरच अवलंबून आहे. येथील मतांवरच आता शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये तुल्यबळ लढत होणार असून यात कोणाची सरशी होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरले आहे. विशेष म्हणजे ठाणे पोलिसांच्या गोपनीय विभागानेसुद्धा मुंब्य्रातील होणाऱ्या मतांच्या विभाजनामुळे येथे कोणाचे पारडे जड आहे, याबाबत साशंकता व्यक्त केली आहे. कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघात आजघडीला ३ लाख ४८ हजार ३६४ मतदार आहेत. यामध्ये १ लाख ८५ हजार ३६७ पुरुष आणि स्त्री मतदारांची संख्या १ लाख ५२ हजार ४१३ असून १० हजार ५८४ मतदारांची संख्या वाढली आहे. या वाढीव मतदारांची मदार कोणत्या बाजूने झुकणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरले आहे. येथे ज्येष्ठ मतदारांची संख्या ४२ हजार ५५ एवढी आहे. १८ ते ३९ वयोगटांतील १ लाख ६८ हजार ८९६ मतदार येथे असून त्यांच्यावरदेखील उमेदवारांची मदार आहे. उमेदवारी अर्ज माघारीनंतर येथील चित्र स्पष्ट झाले असून निवडणूक रिंगणात खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे यासीन कुरेशी, शिवसेनेचे दशरथ पाटील, भाजपाचे अशोक भोईर, मनसेचे महेश साळवी, एमआयएमचे अशरफ मुलाणी, सपाचे सिकंदर खान आमने-सामने आहेत. आव्हाडांना त्यांच्याच मतदारसंघात घेरण्यासाठी सर्वपक्षीयांच्या न झालेल्या युतीमुळे मुंब्य्रातील मतांचे विभाजन अटळ आहे. यामुळे अशरफ मुलाणी, सिकंदर खान, यासीन कुरेशी आणि आव्हांडामध्ये मते विभागली जाणार आहेत. आव्हाडांच्या वाटेला काही प्रमाणात जरी मते आली तरी ती निवडून येण्यासाठी पुरेशी ठरतील, असे वाटत नाही. त्यामुळे त्यांना आता कळव्यातील मतांवरच अवलंबून राहावे लागणार आहे. दरम्यान, शिवसेनेकडून कळव्यातील दशरथ पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे मतविभाजन अटळ आहे.