मुंब्रा : नोकरी आणि शिक्षणामध्ये मुस्लीम समाजाला ५ टक्के आरक्षण मिळाले पाहिजे या प्रमुख मागणीसाठी मुंब्य्रात बुधवारी शांततेत कडकडीत बंद पाळण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या बंदची हाक दिली होती. या भागातील व्यापारी, फेरीवाले, अनेक शैक्षणिक संस्था, हॉटेल व्यावसायिक, डॉक्टर बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. बंद दरम्यान येथील अमृत नगर परिसरात राज्य शासनाचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. विधानसभेत मुस्लीम आरक्षण ठराव संमत करावा यसाठी यापुढे राज्यस्तरावर लढा लढण्यात येणार असल्याची घोषणा नगरसेवक अशरफ पठाण आणि राष्ट्रवादीचे विभागीय अध्यक्ष शमिम खान यांनी बंद दरम्यान केली.आमदार आव्हाड पहाटेपासून रस्त्यावर उतरले होते. मंगळवारी मध्यरात्रीपासून रिक्षा बंद करण्यात आल्यामुळे कामावरून परतणाऱ्यांना कडाक्याच्या थंडीत पायपीट करावी लागली. रस्त्यावरून वाहने चालविण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा रिक्षांची, टीएमटीच्या दोन आणि एसटीच्या एका बसची तोडफोड करण्यात आली. मुस्लीम आरक्षणाची मागणी जोर धरत आहे. (वार्ताहर)