Join us  

पाऱ्याची 'सटकली'; डोंबिवलीत लाही लाही, मुंबईतही पारा 'चाळीशी'जवळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2018 2:56 PM

रविवारनंतर सोमवारदेखील मुंबई, ठाण्यासाठी 'ताप'दायक ठरला आहे.

मुंबई - रविवारनंतर सोमवारदेखील मुंबई, ठाण्यासाठी 'ताप'दायक ठरला आहे. उष्णतेच्या झळांनी नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. सोमवारी (26 मार्च) मुंबईतील तापमान 38 अंश सेल्सिअस तर डोंबिवलीमध्ये 43 अंश सेल्सिअस तापमान आहे. तापमानात वाढ झाल्यानं नागरिकांना घराबाहेर पडणं कठीण झाले आहे. दुसरीकडे, जगातील आठवे उष्ण शहर ठरलेल्या मुंबईत देशातील सर्वाधिक 41 अंश सेल्सिअस तापमानाची रविवारी नोंद झाली. मुंबईत या हंगामातील हे सर्वाधिक तापमान होते. राज्यातील इतर अनेक शहरांतील नागरिकही वाढत्या उन्हामुळे हैरण होते.

मुंबईत 17 मार्च 2011 मध्ये 41.3 तर 26 मार्च 2015 मध्ये 40.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्या व्यतिरिक्त एकदाही मार्च महिन्यात पाऱ्याने 39 अंशांचा टप्पा पार केला नव्हता. मुंबईचे मार्चमधील आतापर्यंतचे सर्वाधिक 41.7 अंश सेल्सिअस तापमान 28 मार्च 1956 मध्ये नोंदले गेले आहे.

दरम्यान, उष्माघाताचा त्रास होऊ नये, यासाठी महानगरपालिकांकडून नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या गोष्टी करणं टाळा

1. दुपारी 12 ते 3 वाजता उन्हात फिरू नका 

2. उच्च प्रथिनयुक्त आहार आणि शिळे अन्न खाऊ नका

3.मद्यसेवन, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रींक्सचे सेवन करू नका, त्यामुळे डीहायड्रेशन होते.

4. पार्किंगमधील वाहनांमध्ये मुलांना किंवा प्राण्यांना सोडू नका

या गोष्टी करा

1. तहान नसल्यासही पुरेसे पाणी प्या.

2. सौम्य रंगांचे, सैल आणि कॉटनचे कपडे वापरा.

3. बाहेर जाताना गॉगल, छत्री, टोपी, बूट किंवा चप्पल वापरा.

4. प्रवास करताना सोबत पाण्याची बाटली घ्यावी.

5. घरांना पडदे, झडपा, सनशेड बसवा.

6. अशक्तपणा जाणवत असल्यास डॉक्टरांकडे जा.

7. ओआरएस, घरातील लस्सी, तोरणी, लिंबू पाणी, ताक इत्यादींचे सेवन करा.

8. जनावरांना सावलीत ठेवा, त्यांना पाणी द्या. 

9. थंड पाण्यानं आंघोळ करा.

मागील 24 तासांमधील प्रमुख शहरांचे तापमानमुंबई 41 अंश सेल्सिअसभिरा 41 अंश सेल्सिअसअकोला 40.5 अंश सेल्सिअससोलापूर 40.2 अंश सेल्सिअस ब्रह्मपुरी 40.1 अंश सेल्सिअसपरभणी 40 अंश सेल्सिअसचंद्रपूर 39.6 अंश सेल्सिअसवर्धा  39.5 अंश सेल्सिअसनांदेड 39.5 अंश सेल्सिअसउस्मानाबाद 39.1 अंश सेल्सिअसगोंदिया 39 अंश सेल्सिअसनागपूर 39 अंश सेल्सिअसयवतमाळ 38.5 अंश सेल्सिअसअमरावती 38.4 अंश सेल्सिअससांगली 38.4 अंश सेल्सिअसअहमदनगर 38 अंश सेल्सिअससातारा 37.5 अंश सेल्सिअसऔरंगाबाद 37.3 अंश सेल्सिअसनाशिक 37.3 अंश सेल्सिअसकोल्हापूर 37.3 अंश सेल्सिअसबुलडाणा 37.2 अंश सेल्सिअसपुणे 37 अंश सेल्सिअसरत्नागिरी 35.9 अंश सेल्सिअसडहाणू 35.1 अंश सेल्सिअसअलिबाग 34.7 अंश सेल्सिअसमहाबळेश्वर 32.6 अंश सेल्सिअस

उष्णतेच्या लाटांचा इशारा

पूर्वेकडून मुंबईसह महाराष्ट्राकडे वाहत असलेल्या उष्ण वा-यामुळे तापमान वाढले आहे. कमाल तापमानात पाच ते सहा अंशांची वाढ होईल, असा अंदाज शनिवारीच वर्तविण्यात आला होता. 24 तासांसाठी उष्णतेच्या लाटांचा इशारा कायम आहे. - कृष्णानंद होसाळीकर, उपमहासंचालक, मुंबई हवामान विभाग