Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईचे तापमान २१ अंशांवर; राज्यात थंडी कायम

By admin | Updated: December 18, 2014 01:20 IST

राज्यात पडलेली कडाक्याची थंडी कायम असून, बुधवारी नाशिक शहराचे किमान तापमान ६.६ अंश सेल्सिअस एवढे नोंदविले आहे.

मुंबई : राज्यात पडलेली कडाक्याची थंडी कायम असून, बुधवारी नाशिक शहराचे किमान तापमान ६.६ अंश सेल्सिअस एवढे नोंदविले आहे. तर मुंबईच्या किमान तापमानात मंगळवारच्या तुलनेत ५ अंशांनी वाढ झाली असून, बुधवारी मुंबईचे किमान तापमान २१.८ अंश सेल्सिअस होते.सोमवारी मुंबई शहराचे किमान तापमान १२ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले होते. डिसेंबर महिन्यात आतापर्यंतचा हा किमान तापमानाचा नीचांक होता. त्याच दिवशी नाशिकचे किमान तापमानदेखील ६ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले होते. मंगळवारी हेच किमान तापमान १६ अंश एवढे नोंदविले होते. त्यानंतर मात्र मुंबईच्या किमान तापमानात तुलनेने वाढ झाली असली तरी थंड वाऱ्याचा प्रवाह कायम राहिल्याने मुंबईकरांना गारवा झोंबत असल्याचे चित्र आहे.हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, नैर्ऋत्य अरबी समुद्र आणि लगतच्या भागावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. मागील २४ तासांत राज्यात हवामान कोरडे नोंदविले आहे. विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीपेक्षा घट, कोकणाच्या काही भागांत सरासरीपेक्षा लक्षणीय घट, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत तर विदर्भाच्या उर्वरित भागात सरासरीपेक्षा किंचित घट झाली आहे. (प्रतिनिधी)