Join us  

मुंबईची प्रलयंकारी बुडिताकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 1:02 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईच्या बहुतेक भागांतील पर्जन्य व मलनिस्सारण यंत्रणा १९३० व ४०च्या दरम्यान बांधली गेली. या ...

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईच्या बहुतेक भागांतील पर्जन्य व मलनिस्सारण यंत्रणा १९३० व ४०च्या दरम्यान बांधली गेली. या यंत्रणांच्या, पाणी बाहेर सोडणाऱ्या मुखांपासून काही अंतरावर सर्वात मोठ्या भरतीच्या पाण्याची रेषा होती. तरच पाणी सागरात सोडले जाणे शक्य होते. परंतु नंतर विकासाच्या नशेत सागरात भराव होतच राहिले. या यंत्रणा बांधल्यानंतरच्या प्रत्येक भरावाने भरती रेषा जमिनीच्या दिशेने ढकलली गेली व पुराच्या दिशेने वाटचाल झाली असून, आता काँक्रिटीकरणाला व भरावांना दोष देण्याऐवजी पावसाला व भरतीला दोष दिला जात आहे, असे म्हणणे अभ्यासकांनी मांडले आहे.

मंगळवारी आणि बुधवारी पडलेल्या पावसाने मुंबई पुन्हा तुंबली. लोकांच्या घरात पाणी गेले. आर्थिक नुकसान झाले. नेहमीप्रमाणे सगळ्यांनी महापालिकेला दोषी ठरविले. मात्र केवळ महापालिका नाही तर आपण सगळे यास दोषी आहोत, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. सुमारे २५ हजार झाडे व मुंबईसाठी महत्त्वाचे काम करणारे माहीमच्या खाडीतील व वरील आरेचे असे दोन जंगलांचे भाग नष्ट करून शहराला स्टेट्स सिम्बॉल देण्याच्या नावाने पूर्ण विनाशाची व्यवस्था केली आहे. मानवी हस्तक्षेपामुळे अनेक पटीने धोका वाढला आहे. निसर्गाने कोट्यवधी वर्षे केलेली रचना आपण बदललेली आहे. मुंबईत १७८४ला वरळी व गिरगाव बेट जोडण्यापासून सुरू झालेल्या विध्वंसाने आता कळस गाठला आहे. मुंबईकर जीव मुठीत धरून असताना लॉकडाऊनला न जुमानता होणारे, मेट्रो ३ भुयारी रेल्वे व सागरी रस्ता प्रकल्प, हे त्याचे उदाहरण आहे. त्यामुळे धोका कमी होण्याऐवजी वाढत आहे.माहीम व वांद्रे भागातील पाण्यासह वरळी व वांद्रे या भूशिरांमधील भागांतून पाणी अरबी समुद्र्रात शिरते. मात्र या पाण्याला सीलिंक प्रकल्प अडवतो.

वांद्रे-कुर्ला संकुलात करण्यात आलेल्या भरावामुळे कुर्ला ते सायनदरम्यानचा रस्ता पाण्याखाली जातो. पश्चिम उपनगरात तिवरांची कत्तल केली जात आहे. येथे पर्यावरणाची हानी झाली असून, पुरासारखी स्थिती निर्माण होते. पूर्व उपनगरात कुर्ला, घाटकोपर, साकीनाका, कमानी, विद्याविहारसह लगतच्या परिसरात साचलेले पावसाचे पाणी पुढे जातच नाही. कारण येथे मोठे नाले साफ झालेले नाहीत. गटारे तर नावाला साफ झाली आहेत..

मुंबईच्या पावसाळी पाण्याचा निचरा करणाºया व्यवस्थेची गृहिते कायमची मोडत आहेत. ग्रामीण शेतीवरील, अवकाळी, अतिवृष्टी, महापूर, उष्णतेच्या लाटा, घटते भूजल, घटते अन्नउत्पादन ही अरिष्टे हा याचाच भाग आहे. सागरी रस्ता व भुयारी रेल्वे हे दोन्ही समस्या वाढवणारे निरर्थक, विध्वंसक प्रकल्प रद्द करण्याची गरज आहे.- गिरीश राऊत, निमंत्रक,मुंबई रक्षण समिती/भारतीय जीवन व पर्यावरण चळवळ

टॅग्स :पाऊस