Join us  

मुंबईचे किमान तापमान २० अंशावर, थंडीचा कडाका होतोय सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 9:32 AM

ऊन आणि उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना आता दिलासा मिळू लागला आहे. कारण मुंबईच्या किमान तापमानात घट नोंदवण्यात येत आहे.

मुंबई : ऊन आणि उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना आता दिलासा मिळू लागला आहे. कारण मुंबईच्या किमान तापमानात घट नोंदवण्यात येत आहे. सोमवारी मुंबईचे किमान तापमान २० अंश नोंदवण्यात आले आहे. किमान तापमानात घट नोंदविण्यात येत असल्याने आता मुंबईकरांना थंडीची हुडहुडी भरणार आहे.

महिन्याभरापासून मुंबईकरांना ऊन आणि उकाड्याने हैराण केले होते. मुंबईचे कमाल तापमान ३७ अंशावर पोहचले होते. तब्बल तीन एक वेळा ३७ अंश तापमान नोंदविण्यात आले होते. कमाल तापमानात काही अंशी चढ उतार नोंदविण्यात येत होते. मात्र ऊन आणि उकाडा काही कमी होत नव्हता. 

महिना सरला तरी कमाल तापमानाचा जाच कायम होता. दिवाळी सरली तरी तापमान कमी होण्याचे नाव घेत नव्हते. अखेर हवामानात झालेल्या बदला नंतर मुंबईचे किमान तापमान २० अंशावर येऊन ठेपले आहे. किमान तापमानात घट झाल्याने मुंबईकरांना किंचित दिलासा मिळाला आहे. दरम्यान मुंबईचे किमान तापमान जोवर १५ अंशाच्या खाली उतरत नाही तोवर मुंबईकरांना थंडीची मजा अनुभवता येता येणार नाही.

राज्याचा विचार करता अनेक ठिकाणचे किमान तापमान अद्याप म्हणावे तसे खाली उतरले नाही. मात्र तरीही राज्यात ठिकठिकाणी हवामान काहीसे थंड आहे. रात्री गारवा आणि दुपारी कडक ऊन अशा काहीशा दुहेरी वातावरणाला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.