Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईचा काेराेना पॉझिटिव्हिटी दर वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:07 IST

नियम कठाेर करणार; दुसरी लाट आली असे म्हणता येणार नाही, अतिरिक्त आयुक्तांची माहितीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मागील ...

नियम कठाेर करणार; दुसरी लाट आली असे म्हणता येणार नाही, अतिरिक्त आयुक्तांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मागील काही दिवसांपासून शहर, उपनगरात पुन्हा एकदा कोरोनाची रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. परिणामी, पॉझिटिव्हिटी दरही वाढल्याने वैद्यकीय तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली. सध्या मुंबईचा पॉझिटिव्हिटी दर चार टक्के आहे. यापूर्वी तो कमी होऊन गेल्या महिन्यात तीन टक्के होता.

शहर, उपनगरात दिवसाला जवळपास १५ हजार कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. २२ जानेवारी रोजी पॉझिटिव्हिटी दर तीन टक्क्यांपर्यंत घसरला होता. मात्र मागील ५-६ दिवसांपासून ताे वाढल्याचे चित्र आहे. याविषयी पालिकेचे अतिरिक्त आय़ुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, मागील काही दिवसांपासून कोरोनाविषयक मार्गदर्शक तत्त्वांचे सामान्यांकडून काटेकोरपणे पालन होताना दिसत नाही. गर्दी वाढत असून मास्क, सॅनिटायजरचा वापर काहीसा कमी झाला आहे. येत्या दिवसांत याविषयीचे नियम कठोर करण्यात येतील. रुग्णसंख्येत झालेली वाढ ही कोरोनाची दुसरी लाट असल्याचे म्हणता येणार नाही.

दरम्यान, पालिका प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून धारावीत मोबाइल व्हॅनद्वारे चाचणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. धारावीत तीव्र संक्रमण काळात रुग्णसंख्या अधिक होती. या पार्श्वभूमीवर आता येथील नागरिकांमध्ये चाचण्यांबाबत जागरूकता निर्माण कऱणे तसेच, रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन चाचणी, निदान आणि उपचार ही त्रिसूत्री पाळण्याबाबत पालिका प्रशासनाकडून भर देण्यात येत आहे.

* सामान्यांसाठी लाेकल सुरू झाली हे एकच कारण नाही!

पालिकेच्या सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी म्हणाले, सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू झाल्याने रुग्णसंख्या वाढली हे केवळ एकमेव कारण नाही. त्यासाठी विविध बाबींचे विश्लेषण व अभ्यास होणे गरजेचे आहे. याशिवाय, शारीरिक अंतर, स्वच्छता आणि मास्कचा वापर याविषयी समान्यांमध्ये गांभीर्य दिसून येत नाही, त्याकडे लक्ष दिले पाहिजे. तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण प्रक्रिया लवकर सुरू करण्यावर भर दिला पाहिजे.

.........................