Join us  

मुंबईकरांनो, जरा पाणी जपून वापरा!, कोरोनापाठोपाठ जलसंकट, तीन वर्षांतील कमी जलसाठा 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 6:52 AM

गेल्या वर्षी तलाव क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे यंदाचा उन्हाळा सुकर झाला. तलावांमध्ये जुलै महिन्यापर्यंत पुरेल एवढा जलसाठा असल्याने मुंबईकर निश्चिंत होते.

मुंबई : गेले दोन दिवस मुंबईत कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने तलाव क्षेत्रात मात्र जोर धरलेला आहे. यामुळे २०१८ आणि २०१९ या दोन वर्षांच्या तुलनेत मुंबईला पाणीपुरवठा करणाºया तलावांमध्ये सर्वात कमी जलसाठा आहे. जुलै महिन्याचा पंधरवडा उलटूनही तलाव क्षेत्रात सुमारे तीन लाख ६१ हजार जलसाठा जमा झाला आहे. यामुळे पाण्याचे टेन्शन वाढण्याची शक्यता असल्याने मुंबईकरांनी आतापासूनच पाणी जपून वापरण्याची गरज आहे.गेल्या वर्षी तलाव क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे यंदाचा उन्हाळा सुकर झाला. तलावांमध्ये जुलै महिन्यापर्यंत पुरेल एवढा जलसाठा असल्याने मुंबईकर निश्चिंत होते. मात्र मान्सून दाखल झाल्यानंतरही जून महिना कोरडा गेला, तर जुलै महिन्यातही पावसाने अद्याप तलाव क्षेत्रामध्ये अपेक्षित जोर धरलेला नाही. अधूनमधून बरसणाºया सरींमुळे तलाव क्षेत्रात आता तीन महिने पुरेल इतका जलसाठा जमा झाला आहे. परंतु, गेल्या दोन वर्षांतील हा सर्वात कमी जलसाठा असल्याने चिंता व्यक्त होत आहे.गेल्या वर्षी जुलै महिन्यात तुळशी, तानसा, मोडक सागर, विहार असे चार तलाव भरून वाहिले होते. तर २५ आॅगस्ट रोजी मध्य वैतरणा आणि ३१ आॅगस्ट रोजी अप्पर वैतरणा हे मोठे तलाव भरून वाहू लागले होते. मात्र यावर्षी मधली पाण्याची पातळी निम्मी आहे. २०१८ मध्ये तलाव क्षेत्रात तब्बल आठ लाख १९ हजार दशलक्ष लीटर जलसाठा होता. तर २०१९ मध्ये १५ जुलैपर्यंत सहा लाख ९७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा होता. या तुलनेत सध्या तलावांमध्ये जेमतेम २५ टक्केही जलसाठा जमा झालेला नाही.दहा वर्षात तीन वेळा ओढावली पाणीटंचाई२००९ मध्ये तलाव क्षेत्रात अपुरा पाऊस झाला होता. यामुळे सन २०१० मध्ये मुंबईकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता, तसेच २०१४ मध्ये पावसाने पाठ फिरवल्यामुळे पाणीबाणीची स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे रेनवॉटर हार्वेस्टिंंग, विहिरींची सफाई, बोअरवेलचा वापर अशा अपारंपरिक पद्धतीने पाणी साठवण्याचे प्रयत्न झाले. मात्र कालांतराने हे सर्व प्रयत्न मागे पडले आणि तलावातील जलसाठ्यावरच महापालिका अवलंबून राहू लागली. २०१८ मध्ये अपुºया जलसाठ्यामुळे मुंबईत काही काळ दहा टक्के पाणीकपात लागू केली.मुंबईत दररोज तीन हजार ८०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. १ आॅक्टोबर रोजी तलावांमध्ये १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा असल्यास वर्षभराचा पाणीप्रश्न मिटतो.

टॅग्स :मुंबई