मुंबई : सप्टेंबरच्या शेवटच्या दोन दिवसांमध्येच पाऱ्याने उच्चांक गाठल्यामुळे आॅक्टोबरचा नुसता विचार करूनच मुंबईकरांचा जीव कासावीस होत आहे. दुसरीकडे राजकीय नेत्यांना, कार्यकर्त्यांना याच रणरणत्या उन्हात प्रचार करण्याच्या विचारांनी घाम फुटू लागला आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांना उष्माघाताचा देखील त्रास होण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे डॉक्टर सर्वांनाच ‘आरोग्य सांभाळा’ असा सल्ला देत आहेत.सध्या मुंबईचे तापमान निवडणुकांमुळे तापले असतानाच वाढणाऱ्या उकड्यात प्रचारासाठी फिरताना राजकीय नेते, कार्यकर्त्यांना त्रास होऊ शकतो. या काळात आर्द्रता जास्त असल्यामुळे घाम जास्त येतो. त्यामुळे शरीरातील पाणी कमी होते. उन्हात फिरल्यामुळे चक्कर येऊ शकते. बाहेरचे तेलकट पदार्थ खाल्यास उलट्या, जुलाबाचा त्रास होऊ शकतो. यामुळे साधा, हलका आहार घेणे योग्य ठरेल. उकाडा जास्त वाढल्यास रक्तदाब कमी होणे, थकवा जाणवणे असाही त्रास होतो, असे ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’चे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. अनिल पाचणेकर यांनी सांगितले. चिडचिड होणे, लक्ष न लागणे, त्वचाविकार, घामामुळे फंगल इन्फेक्शन, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे, असे अनेक परिणाम दिसून येऊ शकतात. (प्रतिनिधी)
मुंबईकरांनो, आरोग्य सांभाळा!
By admin | Updated: October 6, 2014 03:41 IST