मुंबई : विधानसभा निवडणुकांमध्ये आघाडी, युती तुटल्यामुळे पंचरंगी लढती झाल्या. यामुळेच नक्की कोणत्या पक्षाला मत द्यायचे याविषयी अनेकांच्या मनात संभ्रम होता. तर काही ठिकाणी पक्षाकडून योग्य उमेदवार दिला गेला नव्हता. अशा कारणांमुळेच मुंबईकरांनी ‘नोटा’ म्हणजे नन आॅफ दी अबाव्ह हे आपले मत बिनदिक्कतपणे नोंदवले. मुंबईतील ६५ हजार ६६९ मतदारांनी नोटाचा पर्याय निवडलेला आहे. राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये मुंबईतून सर्वांत जास्त म्हणजे ३६ आमदारांचे भवितव्य ठरणार होते. यामुळे सगळ्यांचेच मुंबईकडे लक्ष होते. मात्र यापेक्षा तुटलेली आघाडी आणि युती, अपक्ष उमेदवार, निवडणुकीच्या आधी काही उमेदवारांनी केलेले पक्षांतर यामुळे नक्की कोणाला किती मतदान होणार याचा अंदाज येत नव्हता. मुंबईतील चांदिवली विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक म्हणजे ४ हजार ६५३ मतदारांनी नोटाचा पर्याय स्वीकारला आहे. याच्या खालोखाल चेंबूर विधानसभा मतदारसंघातील ३ हजार ८९४ मतदारांनी, वर्साेवा येथील ३ हजार २६६ तर विक्रोळी येथील ३ हजार २५१ मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला आहे. मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील सर्वांत कमी म्हणजे ८०२ मतदारांनी नोटाचा पर्याय निवडलेला आहे. तर वांद्रे पूर्व येथील ८८३, दिंडोशी येथील १ हजार १३९ आणि कुर्ला येथील १ हजार १९५ मतदारांनी नोटाचा पर्याय वापरला आहे. तर जोगेश्वरी येथील २ हजार ३८ आणि बोरीवली येथील २ हजार ५६ जणांनी नोटालाच पसंती दिलेली आहे. इतर सर्व मतदारसंघांमध्ये हजार ते दोन हजारच्या मध्येच नोटाला पसंती मिळालेली आहे. (प्रतिनिधी)
मुंबईकरांनी नोंदवली नोटाची ‘पासष्टी’
By admin | Updated: October 20, 2014 22:52 IST