Join us
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या जलतरण तलावात मुंबईकरांची ‘उडी’; प्रशिक्षणाला २ हजारांहून अधिक जणांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2023 12:00 IST

मालाड पश्चिम येथे चाचा नेहरू गार्डन, दहिसर पश्चिम कांदारपाडा येथील पालिकेने बांधलेल्या दोन तरण तलावांचे १ एप्रिलला लोकार्पण करण्यात आले.

- रतींद्र नाईकलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईकर नागरिकांना मनसोक्त पोहता यावे, यासाठी पालिकेने सहा तरण तलाव बांधले आहेत. उन्हाळ्यात तर या तरण तलावांत पोहणाऱ्यांची गर्दी वाढली आहे. मात्र, अनेकदा पोहण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण न मिळाल्याने अनेक इच्छुक पोहण्यास घाबरतात. ही निकड लक्षात घेऊन पालिकेने जलतरण तलावांमध्ये  मे महिन्यांत २१ दिवसांचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत २ हजार १६३ मुंबईकरांनी  नोंदणी केली आहे.

मालाड पश्चिम येथे चाचा नेहरू गार्डन, दहिसर पश्चिम कांदारपाडा येथील पालिकेने बांधलेल्या दोन तरण तलावांचे १ एप्रिलला लोकार्पण करण्यात आले. पालिकेचे दादर, चेंबूर, कांदिवली, मालाड असे एकूण ६ तरण तलाव आहेत. मुंबईकरांना पोहण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मिळावे म्हणून पालिकेने या तलावांमध्ये  २ ते २२ मे आणि २३ मे ते १२ जून या कालावधीत प्रशिक्षण घेण्याचे निश्चित केले. पहिल्या तुकडीत १ हजार १७० जणांनी  प्रशिक्षण घेतले तर मंगळवारपासून  दुसऱ्या तुकडीत ९९३ जणांनी नोंदणी केली आहे.

तीन हजार रुपयांत पोहायला शिकाविविध खासगी संस्थांद्वारे १५ दिवसांचे प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणाचे साधारणपणे ६ हजार रुपयांपर्यंत शुल्क असते. पालिकेने मात्र माफक शुल्कात म्हणजेच पंधरा वर्षांपर्यंत रुपये २ हजार रुपये, तर त्यापुढील वयोगटासाठी ३ हजार रुपयांत प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे पालिकेच्या पुढाकाराने आयोजित करण्यात येणारे हे प्रशिक्षण २१ दिवसांचे असून, प्रशिक्षणासाठी इच्छुक असणाऱ्यांना २८ मेपर्यंत नोंदणी करता येणार आहे, असे सांगण्यात आले.