Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईकरांनो, नियोजन करूनच घराबाहेर पडा; अभियांत्रिकी कामांसाठी मध्य, हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक

By सचिन लुंगसे | Updated: May 4, 2024 19:02 IST

मध्य रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे.

मुंबई : मध्य रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ११.५ ते दुपारी ३.५५ पर्यंत ब्लॉक असणार आहे. सीएसएमटी-चुनाभट्टी-वांद्रे डाऊन हार्बर लाईनवर सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे-सीएसएमटी अप हार्बर मार्गावर सकाळी ११:१० ते दुपारी ४:१० पर्यंत ब्लॉक असेल.

सीएसएमटीहून सकाळी १०:२५ ते दुपारी ३:३५ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा येथे डाऊन स्लो मार्गावर वळवण्यात येतील. लोकल १५ मिनिटे लेट असतील. माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान नियोजित थांब्यावर थांबतील. ठाण्यापुढील जलद गाड्या मुलुंड येथे डाऊन फास्ट मार्गावर वळवण्यात येतील. ठाण्याहून सकाळी १०:५० ते दुपारी ३:४६ वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील गाड्या मुलुंड आणि माटुंगादरम्यान अप धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. माटुंगा स्थानकात अप जलद मार्गावर वळवण्यात येतील.

सकाळी ११:१६ ते दुपारी ४:४७ पर्यंत सीएसएमटी/वडाळा रोडवरून वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि वांद्रे/गोरेगावसाठी सीएसएमटीहून सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा सकाळी १०:४८ ते दुपारी ४:४३ वाजेपर्यंत बंद राहतील. पनवेल/बेलापूर/वाशी ते सीएसएमटीपर्यंत सकाळी ९:५३ ते दुपारी ३:२० पर्यंत सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे ते सीएसएमटीपर्यंत सकाळी १०:४५ ते ५:१३ पर्यंत सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म ८) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते संध्याकाळी ६ या कालावधीत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वे मार्गे प्रवास करण्याची परवानगी आहे.

टॅग्स :मुंबई