Join us

मुंबईकरांना चढला साथीच्या रोगांचा ‘ताप’

By admin | Updated: September 23, 2015 02:37 IST

सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे एकीकडे मुंबईकर सुखावले असले तरीही साथीच्या रोगांमुळे तितकेच त्रस्तही झाले आहेत

मुंबई : सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे एकीकडे मुंबईकर सुखावले असले तरीही साथीच्या रोगांमुळे तितकेच त्रस्तही झाले आहेत. मुंबईत या आठवड्यात विविध तापांचे ३ हजार १८३ रुग्ण आढळून आले आहेत. १५ ते २१ सप्टेंबरदरम्यान तापाचे २ हजार ८०० रुग्ण आढळून आले आहेत. डॉक्टरांच्या मते वातावरणात झालेले बदल जीवाणूंच्या वाढीस पोषक असतात. यामुळे व्हायरल फीवरचे रुग्ण जास्त प्रमाणावर आढळून येत आहेत. सर्दी, खोकला, घसा दुखणे अशा दुखण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अनेकांना ताप चढतो. मलेरियाच्या रुग्णांमध्येही या आठवड्यात लक्षणीय वाढ दिसून आली आहे. सात दिवसांमध्ये मलेरियाचे २५२ रुग्ण आढळून आले आहेत. तर डेंग्यूचे ७७ रुग्ण आढळून आले आहेत. स्वाइन फ्लूचे ५४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. १ ते २० सप्टेंबरदरम्यान डेंग्यूची लक्षणे असणाऱ्या अथवा डेंग्यूसदृश २ हजार ४९६ रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण यापैकी अनेक जण पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर जानेवारी ते सप्टेंबरदरम्यान डेंग्यूचे ४६९ रुग्ण आढळून आले आहेत. २०१४ मध्ये डेंग्यूचे ८६१ रुग्ण आढळून आले होते. ई विभागात २० दिवसांमध्ये डेंग्यूचे २७ रुग्ण, तर जी दक्षिणमध्ये २१ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. याच दोन विभागांत डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. जानेवारी ते सप्टेंबर कालावधीत याच दोन्ही विभागांमध्ये डेंग्यूचे ६३ रुग्ण आढळून आले आहेत. दोघांचा मृत्यू अंधेरी येथे राहणाऱ्या ३६ वर्षीय महिलेचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे. थंडी, ताप, उलट्या, अंगदुखी असा त्रास या महिलेला ५ ते ७ दिवस होत होता. यानंतर १२ सप्टेंबरला या महिलेला नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. १९ सप्टेंबर रोजी या महिलेचा मृत्यू झाला. विलेपार्ले येथील २४ वर्षीय तरुणाचा लेप्टोमुळे मृत्यू झाला. १० सप्टेंबर रोजी त्याला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रुग्णालाय ताप, थंडी, कोरडा खोकला, श्वासोच्छ्वासाचा त्रास जाणवत होता. उपचारादरम्यान त्याचा १५ सप्टेंबरला मृत्यू झाला. १डेंग्यूच्या रुग्णांपैकी ८० टक्के रुग्णांच्या घरातच डेंग्यूच्या डासांची पैदास होत असते. दोन थेंब पाणीदेखीस सात दिवस साचून राहिल्यास त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होण्याचा धोका असतो. यामुळे सर्वच नागरिकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. २मुंबईत २०१० साली मलेरियाची मोठी साथ पसरली होती. त्यानंतर मलेरिया रोखण्यासाठी महापालिकेने एक विशेष मोहीम हाती घेतली होती. साचलेल्या पाण्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. यामुळे मुंबईतील रस्त्यांवर पाणी साचणार नाही, गटारांमध्ये साचलेले पाणी अधिक काळ उघडे राहणार नाही, याकडे महापालिकेने लक्ष दिले. यात महापालिकेला यश मिळाले. परंतु डेंग्यूच्या बाबतीत असे घडताना दिसत नाही.३डेंग्यूचे डास हे स्वच्छ साचलेल्या पाण्यात निर्माण होतात. स्वच्छ साचलेले पाणी हे घरात मोठ्या प्रमाणावर असते. यामुळे बहुतांश ठिकाणी घरातच डासांची पैदास होत असल्याचे आढळून येते. त्यामुळे नियंत्रण मिळवणे कठीण जात असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले. ४कमी पाण्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. टाक्या, फ्लॉवर पॉट, मनीप्लँट इत्यादी ठिकाणी पाण्याचा साठा असतो. यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता असल्याचे साथरोग नियंत्रण कक्षाच्या प्रमुख डॉ. मिनी खेत्रपाल यांनी सांगितले.