Join us  

मुंबईकरांनो, सावधान... स्वाइन फ्लू पसरतोय; ८ दिवसांत ३४ जणांना संसर्ग 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 9:32 AM

दरवर्षी पावसात मुंबईत साथीचे आजार वाढतात. यंदाही पावसाच्या सुरुवातीला मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या वाढली आहे

मुंबई - पावसाळ्याच्या पाठोपाठ मुंबईत साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. अवघ्या आठ दिवसांत मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रोने शंभरी ओलांडली असून, उपचारासाठी पालिका रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांत रुग्ण गर्दी करत आहेत. पावसाळी आजार वाढल्याने नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दरवर्षी पावसात मुंबईत साथीचे आजार वाढतात. यंदाही पावसाच्या सुरुवातीला मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. या रुग्णांसह हिपेटायटीस, चिकनगुनिया आणि स्वाइन फ्लूचे रुग्णही १ ते ८ जुलै दरम्यान वाढले आहेत. गेल्या महिनाभरात डेंग्यूचे ३५३, मलेरियाचे ६७६, तर गॅस्ट्रोचे तब्बल १,७४४ रुग्ण आढळले होते, ही वाढ कायम आहे. पावसाचे पाणी साचून राहत असल्याने दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो, टायफॉइड, कॉलरा, कावीळ असे आजार, तर कीटकांच्या प्रभावामुळे मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया असे आजार पसरतात. त्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून पावसाळ्यासाठी संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

स्वाइन फ्लू हातपाय पसरतोय मुंबईत गेल्या महिनाभरात स्वाइन फ्लूचे (एच१एन१) ९०  रुग्ण आढळले आहेत, तर जुलैमध्ये आठ दिवसांत ३४ रुग्ण आढळले आहेत. स्वाइन फ्लूची लागण झाल्यास ताप, घसा खवखवणे, अंगदुखी, थकवा, अतिसार, उलट्या, अचानक तोल जाणं, श्वसनाचा त्रास, मुलांची त्वचा निळसर होणे, अंगावर पुरळ येणे अशी लक्षणे आढळतात.

अशी घ्या काळजी...कीटकनाशक विभागाकडूनही पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धूम्रफवारणी मोहीम व्यापकपणे राबविण्यात येते, तरीही सततच्या पावसामुळे आणि अस्वच्छतेमुळे साथीचे आजार बळावत असल्याचे समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर पावसाळी आजार टाळण्यासाठी नागरिकांनी घर-परिसर स्वच्छ ठेवावा, पाणी साचू देऊ नये, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नये, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :स्वाईन फ्लू