मुंबई : मुंबईसह राज्यभरातील ऊन्हाची काहिली वाढतच असून, वातावरणात उल्लेखनीय बदल होत आहेत. विशेषत: कमाल तापमानात वाढ होत असतानाच, आता रविवारसह सोमवारी दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, तर रविवारी विदर्भात उष्णतेची लाट राहील, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे. परिणामी, तापदायक ऊन्हाचे चटके उत्तरोत्तर वाढतच असून, वाढत्या उष्णतेसह उकाड्याने मुंबईकर घामाघूम झाले आहेत.गुजरातवर निर्माण झालेल्या प्रतिचक्रीवादळाचा परिणाम म्हणून उष्ण वारे मुंबईसह राज्यात वाहत होते. त्यामुळे येथील कमाल तापमानात वाढ झाली. मुंबईचे कमाल तापमान थेट ३८ अंशावर, तर भिराचे कमाल तापमान थेट ४६ अंश नोंदवण्यात आले. कालांतराने कमाल तापमानात काही अंशी घसरण झाली असली, तरी वातावरणात झालेल्या उल्लेखनीय बदलामुळे राज्य तापलेलेच राहिले. सद्यस्थितीत राज्यातील प्रमुख शहरांचे सरासरी कमाल तापमान ३८ अंशाच्या आसपास असून, कमाल तापमानात वाढ होत असतानाच, मराठवाड्याला पावसाचा तर विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, मागील तीन दिवसांपासून मुंबईच्या वातावरणात बदल नोंदवण्यात येत आहे. आर्द्रतेमधील कमी-अधिक फरकासह येथील हवामान ढगाळ आहे. परिणामी, उकाड्यात वाढ होत असून, वाढत्या उकाड्यामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. (प्रतिनिधी)
मुंबईकर उकाड्याने घामाघूूम
By admin | Updated: April 2, 2017 01:53 IST