मुंबई : भारत विरुध्द पाकिस्तानच्या क्रिकेट सामन्यात भारताने पाकिस्तानचा दारुण पराभव केल्यानंतर मुंबईकर नागरिकांनाही रविवारी सायंकाळी गल्लीबोळासह रस्त्यांवर आणि चौकाचौकात विजयाचा आनंद एकमेकांचे तोंड गोड करीत साजरा केला.रविवारी सकाळी ९ वाजल्यापासून सुरू झालेला भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी मुंबई शहर आणि उपनगरांतील सार्वजनिक मित्र मंंडळांनी मंडळांच्या कार्यालयांत टीव्ही बसविला होता. सकाळपासूनच रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत होता. मंडळांचे कार्यकर्ते मंडळाच्या कार्यालयांत सामन्याचा मनमुराद आनंद लुटत होते. तर शहर आणि उपनगरांतील चाळींतल्या प्रत्येक घरात आज सासू-सुनांच्या मालिकांऐवजी फक्त आणि फक्त क्रिकेटचाच फिव्हर चढला होता. भारताने नाणेफेक जिंकत फलंदाजी स्वीकारल्यानंतर प्रत्येक शॉटला मुंबईकरांची दाद मिळत होती. जणूकाही प्रत्यक्षात आपणच फलंदाजीसाठी खेळपट्टीवर उतरलो आहोत, असा आनंद क्रिकेटप्रेमी मुंबईकरांना झाला होता. विराट कोहलीने खेळलेली दमदार खेळी आणि त्याला साथ देत अर्धशतक ठोकणाऱ्या शिखर धवनची फलंदाजी पाहण्यासाठी घरगल्ल्यांसह चौकांमधील टीव्ही शॉपही हाऊसफुल्ल झाले होते. भारताची फलंदाजी पूर्ण होईपर्यंत म्हणजेच सकाळपासून दुपारपर्यंत मुंबापुरीच्या रस्त्यांवर महत्त्वाची कामे करण्यासाठी बाहेर पडलेले नागरिक वगळता उर्वरित मुंबईकरांनी सामना पाहण्यासाठी स्वत:ला झोकून दिले होते. भारताची फलंदाजी आणि पाकिस्तानची गोलंदाजी पाहताना मुंबईकरांनी खास जेवणाचा बेतदेखील आखल्याचे काही क्रिकेटप्रेमींनी सांगितले. भारताच्या फलंदाजीदरम्यान लागणारे षटकार - चौकार आणि गडी बाद झाल्यानंतर पाकिस्तानच्या खेळाडूंच्या नावे बोटे मोडण्यात मुंबई रविवारी न्हाऊन निघाली होती.मध्यांतर झाल्यानंतर पुन्हा भारताचे क्षेत्ररक्षण आणि पाकिस्तानची फलंदाजी पाहण्यासाठी आतुर झालेल्या मुंबईकरांचे डोळे टीव्हीकडेच लागले होते. पहिल्या पंधराएक मिनिटांत पाकचा पहिला गडी बाद झाल्यानंतर मुंबईकरांनी अक्षरश: भारतीय गोलंदाजांना डोक्यावर घेतले. कालांतराने पहिले पाच खेळाडू बाद झाल्यानंतर भारताच्या विजयाची केवळ औपचारिकता शिल्लक होती. परिणामी भारत विजयी होणारच, असे गृहीत धरून नाक्यानाक्यावर, गल्लीबोळात आणि रस्त्यांवर बँजो वाजू लागले होते. स्थानिक बँजो पार्ट्यांनीही निमंत्रण नसतानादेखील स्वत:हून विजयोत्सव साजरा करण्यासाठी जय्यत तयारी केली होती. मंडळांच्या कार्यकर्त्यांनी तत्काळ फटाक्यांची आॅर्डर देत मिरवणुकीची तयारी सुरू केली होती.शाहिद आफ्रिदी आणि मिस्बाह उल हक हे दोघे खेळपट्टीवर असल्याने मुंबईकरांची थोडी धाकधूक शिल्लक होतीच. जेव्हा शाहिद आफ्रिदी बाद झाला, तेव्हा मात्र आनंदाच्या भरात सर्वांनीच टीम इंडियासाठी जोरदार घोषणाबाजी केली. भारताच्या विजयाची ही जणूकाही पोचपावतीच होती. तोवर मुंबईतल्या गृहनिर्माण संस्थांचे परिसर, मंडळाचे कट्टे, चाळीच्या घरगल्ल्या असे सारेकाही विजयोत्सवासाठी आतूर झाले होते. आणि जेव्हा पाकचा शेवटचा गडी बाद झाला तेव्हा तर मुंबईकरांच्या आनंदाला उधाण आले. टीम इंडियाच्या घोषणांनी मुंबापुरी दणाणून गेली. रविवारी रात्री भारताचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी भायखळा, माझगाव, लालबाग, वरळी, गिरगाव, नायगाव, दादर, चिंचपोकळी, परळ व्हिलेज, कुर्ला, घाटकोपर, भांडुप, मुलुंड, अंधेरी, गोरेगाव, बोरीवली, विलेपार्ले, वांद्रे आणि दहिसर अशा सर्वच ठिकाणी आनंद साजरा झाला. आतषबाजीने या सगळ््या उत्साहाला चार चांद लावले. (प्रतिनिधी)
विजयोत्सवात रंगले मुंबईकर!
By admin | Updated: February 16, 2015 05:05 IST