Join us  

आरे वाचवण्यासाठी मुंबईकर सरसावले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 12:43 AM

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गिकेच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील सुमारे २ हजार ७०० झाडे तोडण्यास महापालिकेने नुकतीच मंजुरी दिली.

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गिकेच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील सुमारे २ हजार ७०० झाडे तोडण्यास महापालिकेने नुकतीच मंजुरी दिली. याविरोधात पर्यावरणवादी संघटना, राजकीय पक्ष आणि मुंबईकर एकवटले आहेत. रविवारी याविरोधात आरेमध्ये सर्वांनी एकत्र येत आंदोलन केले. मुंबईच्या फुप्फुसांना वाचवा, मुंबई वाचवा अशी घोषणा देत कारशेडला विरोध दर्शवत आंदोलन केले.आरेतील कारशेडला विरोध करत पर्यावरणवाद्यांनी रविवारी आरेतील रस्त्यावर मानवी साखळी तयार केली. या साखळीमध्ये मोठ्या प्रमाणावर मुंबईकर सामील झाले. पर्यावरणवाद्यांनी प्रस्तावित कारशेडच्या जागेवरील एका झाडाला रिंगण करत अनोखे आंदोलन केले. कांजूरमार्ग येथील पर्याय एमएमआरसीकडे उपलब्ध असताना कारशेड आरेमध्येच का उभारण्यात येत आहे, असा सवालही पर्यावरणवादी संघटनांनी उपस्थित केला. या आंदोलनामध्ये स्थानिक आणि इतर सेवाभावी संस्थाही सामील झाल्याने मोठ्या प्रमाणावर आंदोलन झाले. जोपर्यंत येथील कारशेड दुसरीकडे हलवत नाही आणि झाडे तोडण्यास दिलेली परवानगी रद्द करत नाही तोपर्यंत आमचा विरोध आम्ही सुरू ठेवणार असल्याचे पर्यावरणवादी संघटनांनी स्पष्ट केले.आरे वाचवा मुंबई वाचवा, आरे बचाव कारशेड हटाव, बचाएंगे आरे तो बचेंगे हम सारे, सेव्ह आरे, अशा घोषणा या वेळी आंदोलकांमार्फत देण्यात आल्या. आम्ही नंतर चिपको आंदोलन करणार असल्याचेही या संघटनांनी सांगितले.आरेमध्ये औषधी झाडे आहेत. आरेतील मेट्रो कारशेडच्या जागेवर परदेशी झाडे आहेत. यामुळे या परिसरातील झाडांची ओळख करून देण्याचे आयोजन ट्री अप्रेसिएशन वॉकच्या वतीने करण्यात आले.याशिवाय सकाळी आरेमध्ये सायकल चालवण्यात आली. आरेमधील आदिवासी पाड्यांची ओळख करून देण्यात आली. येथील संस्कृती नेमकी काय आहे, हे मुंबईकरांना समजावे असा प्रयत्न होता. यानंतर बिरसा मुंडा चौक येथे जोरदार निदर्शने करण्यात आली. काँग्रेसच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. या विभागातील आदिवासी समाजाचे नागरिक, सेव्ह आरे या संस्थेचे कार्यकर्ते व मुंबईकर नागरिक मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.>एमएमआरसीचे दावे पर्यावरणवाद्यांनी खोडलेमेट्रोमुळे मुंबईची हरित फुप्फुसे नष्ट होणार नसून कारशेड हे फक्त ३० हेक्टरमध्ये बांधण्यात येणार आहे आणि केवळ २ हजार ६४३ वृक्षांची पडझड होणार असल्याचे एमएमआरसीने यापूर्वी स्पष्ट केले होते, यावर केवळ ३० हेक्टर जमीन हे चुकीचे विधान आहे. कारशेडची प्रत्यक्ष जागाच ६५ हेक्टर आहे. यावर हजारपेक्षाही जास्त वृक्ष आहेत, असा दावा पर्यावरणवाद्यांनी केला़ पर्यावरण आघात मूल्यमापन अभ्यासानुसार कारशेडच्या ठिकाणी वन्यजीव अधिवास नसल्याचे एमएमआरसीने स्पष्ट केले होते, यावर आरेमध्ये ७ बिबट्यांचा तसेच इतर अनेक वन्यजीवांचा अधिवास आहे, याची नोंद वनविभागाने घेतली असल्याचे पर्यावरणवाद्यांनी सांगितले़