Join us

मुंबईकर कोमल जैन सीए परीक्षेत देशात पहिली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:26 IST

नोव्हेंबर २०२० महिन्यात झालेला सीए परीक्षेचा निकाल जाहीरलोकमत न्यूज नेटवर्कमुंबईनोव्हेंबर २०२० मध्ये सीए (चार्टर्ड अकाैंटंट) अभ्यासक्रमाची ...

नोव्हेंबर २०२० महिन्यात झालेला सीए परीक्षेचा निकाल जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई

नोव्हेंबर २०२० मध्ये सीए (चार्टर्ड अकाैंटंट) अभ्यासक्रमाची अंतिम परीक्षा घेण्यात आली होती. तिचा निकाल मंगळवारी सकाळी जाहीर करण्यात आला असून, मुंबईकर असलेल्या कोमल जैन हिने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. सीए परीक्षेत कोमलने ७५ टक्के गुण मिळवीत देशात पहिल्या येण्याचा मान मिळविला आहे. ८०० पैकी ६०० गुण मिळवीत कोमलने हे यश संपादित केले आहे. सोबतच सुरतच्या मुदित अग्रवाल याने देशात दुसरा, तर मुंबईच्याच राजवी नाथवानी हिने तृतीय स्थानावरील यश संपादित केले आहे.

नोव्हेंबर २०२० मध्ये झालेल्या एकूण ४,७१,६१९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. यात सीए फाउंडेशन, इंटरमिजीएट आणि फायनलच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. एकूण १,०८५ केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली होती. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर या परीक्षेला खूप विरोध होत होता. प्रकरण अखेर सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले होते. ज्या उमेदवारांना महामारीसंबंधी मुद्द्यांमुळे परीक्षा देता आली नाही, त्यांना जानेवारीत यासाठी आणखी एक संधी देण्यात आली होती. सीए परीक्षेच्या जुन्या अभ्यासक्रमाचा निकाल ५.८४ टक्के, तर नव्या अभ्यासक्रमाचा निकाल १४.४७ टक्के लागला आहे.

कोमल हिने पोदार महाविद्यालयातून वाणिज्य शाखेतील पदवीचे शिक्षण पूर्ण केले असून सीए परीक्षेची त्या दरम्यान ती तयारी करीत होती. कॉर्पोरेट क्षेत्रात करिअर घडविण्याची इच्छा असलेल्या कोमलला अद्याप फायनान्स किंवा कन्सल्टन्सी यांमधील एक पर्याय निवडायचा असल्याची प्रतिक्रिया तिने दिली. द्वितीय क्रमांकावर आलेल्या सुरतच्या मुदितला ८०० पैकी ५८९ गुण मिळाले असून ७३. ६३ % मिळाले आहेत; तर तृतीय क्रमांकावरील राजवीला ८०० पैकी ५८७ गुण म्हणजेच ७३.३८ टक्के गुण मिळाले आहेत. नव्या अभ्यासक्रमाला ग्रुप १ आणि ग्रुप २ मिळून एकूण १९ हजार २८४ विद्यार्थी बसले होते. त्यांपैकी २७९० विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यात यश मिळाले आहे.

जुन्या अभ्यासक्रमातील परीक्षेत सालेम येथील एसाकीराज ६९.१३ टक्के गुण मिळवीत प्रथम, चेन्नईची सुप्रिया आर ६२. ६३ टक्के मिळवीत दुसरी; तर जयपूर येथील मयांक सिंह ६१.१३ टक्के गुण मिळवीत तिसरा आला. या परीक्षेत ग्रुप १ व ग्रुप २ मिळून एकूण ४१४३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते; त्यांपैकी २४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.