मुंबई : गेल्या सात दिवसांत सतत बदलणाऱ्या हवामानामुळे मुंबईकरांचे आरोग्य ढासळले आहे. सात दिवसांमध्ये मुंबईत २ हजार तापाचे रुग्ण आढळले असून गॅस्ट्रोचे ४१० रुग्ण आढळून आले आहेत. स्वाइनच्या रुग्णांचा आलेखही चढता आहे. २० ते २६ जुलैदरम्यान तापाचे १ हजार ९११ रुग्ण आढळले आहेत. तापमानातील चढ-उतार आणि पावसामुळे तापाच्या रुग्णांत वाढ झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. तापाच्या बरोबरीनेच मलेरियाच्या रुग्णांमध्येही वाढ झालेली आहे. मलेरियाचे १२६ तर डेंग्यूचे ११ नवे रुग्ण आढळून आले आहेत. स्वाइनच्या रुग्णांमध्येही वाढ होताना दिसत आहे. जून महिन्यात स्वाइनचे रुग्ण आढळून येत नव्हते. पण जुलै महिन्यापासून स्वाइनच्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. सात दिवसांमध्ये स्वाइनचे तब्बल ७४ रुग्ण आढळून आले आहेत. पावसात भिजल्यामुळे, उकडत असताना थंड पदार्थ खाल्ल्यामुळे अनेकांना सर्दी, खोकला, ताप असा त्रास मुंबईकरांना जाणवत आहे. पावसाला सुरुवात झाल्यावर डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांत वाढ होऊ शकते. यामुळे मुंबईकरांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिका करत आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यांमध्ये लेप्टोच्या रुग्णांची संख्या वाढली होती. त्यानंतर लेप्टोचे रुग्ण कमी झाले होते. पुन्हा सुरू झालेल्या पावसामुळे लेप्टोच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. सात दिवसांमध्ये लेप्टोचे १० रुग्ण आढळून आले आहेत. टायफॉइडचे ३०, हॅपिटायटिसचे (ए, ई) २० तर कॉलराचे २ रुग्ण आढळून आले आहेत. (प्रतिनिधी)
मुंबईकर तापाने फणफणले
By admin | Updated: July 29, 2015 03:42 IST