Join us

मुंबईकर आनंदले

By admin | Updated: June 8, 2015 04:00 IST

उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना मान्सूनपूर्व सरींनी रविवारी पहिल्या पावसाची ट्रीट दिली.

मुंबई : उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना मान्सूनपूर्व सरींनी रविवारी पहिल्या पावसाची ट्रीट दिली. प्रत्यक्ष मान्सूनने अद्याप राज्यात प्रवेश केला नसला तरी मान्सूनपूर्व सरींतही मुंबईकरांनी पहिल्या पावसाची मजा लुटली.सकाळपासून ढगाळ वातावरणाने ताबा घेतलेल्या मुंबईत दुपारी हलक्या सरी बरसू लागल्या. त्याबरोबर मुंबईकरांनी कल्ला करण्यास सुरुवात केली. बच्चेकंपनीसोबत युवामंडळीही मोबाइलला बगल देत आज रस्त्यावर उतरली होती. शहरातील गल्ल्याबोळांसह मुख्य रस्त्यांवर फुटबॉल आणि क्रिकेटचे सामने रंगले होते. तर उपनगरांत सर्व्हिस रोडवर साचलेल्या पाण्यामध्ये बच्चेकंपनीने डुबक्या मारल्या. दुपारनंतर पावसाच्या जोरासोबत खेळही चांगलेच रंगले होते.पहिल्या पावसामुळे गेल्या आठ महिन्यांत रस्त्यावर सांडलेल्या तेलाचे तवंग वर आले होते. त्यामुळे दुचाकीस्वारही जपून गाडी हाकताना दिसले. रविवारच्या सुटीमुळे रस्त्यांवर गाड्यांची वर्दळ कमी होती. तुलनेत पावसात भिजणाऱ्यांची गर्दीच जास्त दिसत होती. (प्रतिनिधी)चौपाट्या हाऊसफुल्लपहिल्या पावसाची मजा लुटण्यासाठी मुंबईकरांनी नेहमीप्रमाणे चौपाटीची वाट धरली. तरुणाईसोबतच बच्चेकंपनीला घेऊन आलेल्या दाम्पत्यांची संख्या वाखाणण्याजोगी होती. कट्ट्यावर बसून ग्रुप सेल्फी काढण्याचा मनसोक्त आनंद मुंबईकरांनी घेतला. गिरगाव, दादर, जुहू चौपाटी किनाऱ्यांसह मरिन लाइन्सच्या किनाऱ्यावरही पर्यटक उतरले होते.टपरींवरही गर्दीपावसाने वातावरणात थंडावा आणल्याने खवय्यांनी मुंबईतील नाक्यानाक्यावरील टपरींची वाट धरली होती. रविवार असूनही बटाटेवडे , कांदा-भजी विकणाऱ्यांच्या टपरींभोवती गर्दी होती. तसेच चहाच्या टपरींचा ताबाही मुंबईकरांनी घेतला.उड्डाणपुलांना पुन्हा गळतीपहिल्याच पावसात उड्डाणपुलांना लागलेली गळती चव्हाट्यावर आली. भारतमाता ते भायखळा उड्डाणपूल, जेजे उड्डाणपूल या पुलांवरून पाण्याचा निचरा करण्याची सोय प्रशासनाने अद्याप केलेली नाही. परिणामी उड्डाणपुलावरील पाणी धबधब्याप्रमाणे रस्त्यावर कोसळत होते. दुचाकीस्वारांना त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. या धबधब्यांमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग आणि मोहंमद अली मार्गावर काही दुचाकीस्वारांचे किरकोळ अपघात झाल्याचे निदर्शनास आले.