Join us  

मुंबईत विणणार बोगद्यांचे जाळे; पालिकेची तयारी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2024 10:15 AM

मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्त करणार.

मुंबई : लोकल, मेट्रो, बेस्टची बस, टॅक्सी यासारख्या वाहनांनी प्रवास करून मुंबईकर आपापली कार्यालये गाठत असतात. भुयारी मेट्रोही नजीकच्या भविष्यात सेवेत रुजू होईल. मात्र, मुंबईकरांचा प्रवास अधिकाधिक सुलभ व्हावा यासाठी आता चक्क मुंबईच्या पोटातूनच प्रवास करण्यासाठी जमिनीखाली बोगद्यांचे जाळे निर्माण केले जाणार आहे. यासाठी पालिकेकडून याचा तपशीलवार अहवाल आणि मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी तयारी सुरू झाली आहे.  याची सुरुवात म्हणून पालिकेच्या पूल विभागाकडून शुक्रवारी या मल्टी मॉडेल टनेल कनेक्टिव्हिटी प्रकल्पासाठी सल्लागार नियुक्तीसाठी निविदा मागविण्यात आली आहे.

प्राथमिक टप्प्यात हे सल्लागार किती बोगद्यांचे जाळे असावे, याचे आरेखन कसे असावे, प्रकल्पाचा अंदाजे किती खर्च येईल या सगळ्याचा तपशीलवार अहवाल तयार करतील, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे. मुंबई महानगर प्रदेशासह संपूर्ण मुंबईतील विस्तारित कनेक्टिव्हिटीसह एकात्मिक मास्टर प्लॅन तयार करण्याचा मानस या प्रकल्पाचा असल्याचे सांगण्यात आले. या शिवाय परदेशात पावसाचे पाणी विविध भूमिगत जाळ्याद्वारे वाहून नेऊन त्याचा निचरा केला जातो. या पार्श्वभूमीवर या प्रकल्पात ही नियुक्त सल्लागाराकडून मुंबईत अशी व्यवस्था करता येऊ शकते का ? कशी करता येईल याबाबत माहिती घेणे आणि सादर करणे अपेक्षित असणार आहे . यामुळे मुंबईतील पूरसदृश परिस्थितीवर नियत्रंण मिळविता येणे शक्य होणार आहे.

अभ्यास खर्च पालिका करणार :

 प्रकल्पासाठी नेटवर्क सिस्टिमचा मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी केलेल्या अभ्यासाचा खर्च महापालिका करणार आहे. समितीत महापालिका आणि एमएमआरडीएच्या आयुक्तांसह एमएसआरडीसी आणि पालिकेच्या अभियंत्यांचा समावेश आहे.

समितीची उद्दिष्टे :  

  वाहतूक बोगद्याच्या ठिकाणे निश्चिती करणे. 

  रहदारीला प्राधान्य देत त्या आधारावर बोगद्यांचे टप्पे निश्चित करणे.

  आपत्कालीन पूर मदत म्हणून स्मार्ट बोगद्याच्या संकल्पना शोधणे.

  युटिलिटी कॉरिडॉरचे एकत्रीकरण करणे. 

  पर्यावरणीय प्रभावाचा अभ्यास करणे. 

  बोगद्यांसाठी कालमर्यादा निश्चित करणे.

  स्मार्ट टनेल नेटवर्कचा मास्टर प्लॅन तयार करणे. 

 मास्टर प्लॅनच्या अंमलबजावणीसाठी टप्पे तयार करणे.

शासनाची समिती स्थापन :

  या प्रकल्पासाठी महापालिका आयुक्तांच्या नेतृत्वाखाली आठ सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. मुंबईतली वाढती लोकसंख्या लक्षात घेता भविष्यातील वाहतूक प्रकल्प बळकट करण्यावर जोर देण्यात येत आहे. या प्रकल्पांमध्ये कोस्टल रोड, मेट्रो प्रकल्पांचा समावेश आहे. मुंबई महानगर प्रदेशासह संपूर्ण मुंबईतील विस्तारित कनेक्टिव्हिटीसह एकात्मिक मास्टर प्लॅन तयार करून मुंबईतल्या बोगद्यांच्या नेटवर्कसाठी समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे.

 विशेष म्हणजे पायाभूत सुविधा या विषयांवर काम करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, अलीकडेच स्थापन करण्यात आलेले राज्य पायाभूत सुविधा महामंडळ आणि शासनाचा सार्वजनिक बांधकाम विभाग असतानाही महापालिकेकडे हे काम सोपविण्यात आले आहे.  

टॅग्स :मुंबईनगर पालिका