लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पावसाळ्यात पाणी तुंबून पूर परिस्थिती निर्माण होऊ नये, मुंबईची तुंबापुरी होऊ नये, यासाठी मुंबई महापालिकेने अर्थसंकल्पात भरघोस तरतूद केली आहे. त्यानुसार, पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे सुधारण्यासाठी कामे हाती घेण्यात आली आहेत. ५८ कामांपैकी ४० कामे पूर्ण झाली असून, १५ कामे प्रगतिपथावर आहेत. ३ कामे लवकर सुरू केली जातील आणि बाकीचे कामे प्रगतीवर आहेत.
भायखळा येथील पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड ते रे रोडपर्यंत काम हाती घेण्यात आले आहे. दादर येथील पाणी साचण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी दादर टी.टी. आणि मंचेरजी जोशी रोडवरील पर्जन्य जलवाहिन्यांच्या क्षमतेमध्ये वाढ करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. एम.जी. रोडपासून लिंक रोडपर्यंत पोईसर नदी वळविणे आणि रुंदीकरणाचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम पूर्ण झाल्यानंतर कांदिवली येथील डहाणूकरवाडी परिसराला पूर परिस्थितीपासून दिलासा मिळेल.
शिवडीमधील पूरपरिस्थिती दूर करण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्ट परिसरातील रेनॉल्डस कॉलनी येथे नलिका टाकण्याचे काम प्रस्तावित आहे. प्रतीक्षानगर येथे पेरिफेरल नाला वळविणे आणि नाल्याच्या रुंदीकरणाचे काम प्रस्तावित आहे. मालाड येथील पावसाच्या पाण्याचा निचरा पोईसर नदीत वेगाने होण्यासाठी आणि पाणी साठण्याचे प्रमाण कमी होण्याकरिता महेश्वरी नाला वळविण्यासह रुंदीकरणाच्या कामासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत.
उघड्या नाल्यातून थेट समुद्रात कचरा वाहून जाऊ नये म्हणून इर्ला आणि लव्हग्रोव्ह नाला याठिकाणी बॅक रेक स्क्रीनसाठी ५० कोटींची तरतूद आहे. हे काम २०२१ च्या पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल.
..................