Join us  

होळीनंतर मुंबई आणखी तापणार; उष्णतेच्या लाटेने मुंबईकर हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 6:41 AM

विशेषतः सकाळी ११ वाजल्यापासून ते दुपारी ४ वाजेपर्यंत आग ओकणारा सूर्य कमाल तापमानात भर घालत आहे.

मुंबई :  कोकणात आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे गेल्या आठवड्याभरापासून मुंबईचे कमाल तापमान सातत्याने ३७ ते ३९ अंशादरम्यान नोंदविण्यात येत आहे. बुधवारीदेखील मुंबापुरीचे कमाल तापमान ३७.५ अंश नोंदविण्यात आले असून, उष्णतेच्या लाटेने मुंबईकर हैराण झाले आहेत. बदलत्या ऋतुमानानुसार होळीनंतर उन्हाळा आणखी तापदायक ठरण्याची दाट शक्यता आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानातील तापमान ४० ते ४२ अंशाच्या आसपास असून, गुजरात आणि महाराष्ट्रात बहुतांश शहरांचे विशेषतः कोकणातील अनेक शहरांचे कमाल तापमान ३८ ते ३९ अंशादरम्यान नोंदविण्यात आले आहे.मुंबईचा पारा सातत्याने ३७ अंश एवढा नोंदविण्यात आला आहे.

विशेषतः सकाळी ११ वाजल्यापासून ते दुपारी ४ वाजेपर्यंत आग ओकणारा सूर्य कमाल तापमानात भर घालत आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे दाखल झालेल्या उष्णतेच्या लाटेने मुंबईच्या कमाल तापमानात सातत्याने भर घातली असून, १७ मार्चनंतर उष्णतेच्या लाटेचा जोर ओसरले, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

टॅग्स :तापमानमुंबई