Join us  

मुंबई ढगाळ, विदर्भात गारा पडणार, उत्तर भारत गारठला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 4:57 AM

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र, वाऱ्याने बदललेली दिशा अशा प्रमुख बदलांमुळे देशासह राज्य आणि मुंबईच्या हवामानात प्रामुख्याने बदल नोंदविण्यात येत आहेत.

मुंबई : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र, वाऱ्याने बदललेली दिशा अशा प्रमुख बदलांमुळे देशासह राज्य आणि मुंबईच्या हवामानात प्रामुख्याने बदल नोंदविण्यात येत आहेत. बुधवारी उत्तर भारतातील किमान तापमानात लक्षणीय घट नोंदविण्यात आली असून, मुंबईत दुपारपर्यंत ढगाळ हवामानाची नोंद झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे विदर्भाला गारपिटीचा इशारा देण्यात आला असून, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यालाही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईचे किमान तापमान बुधवारी १९.२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले असून, राज्यात सर्वांत कमी किमान तापमान अहमदनगर येथे ९.५ अंश नोंदविण्यात आले आहे. गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात किंचित घट झाली आहे. कोकण, गोव्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदवले आहे.काही शहरांचे किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये : पुणे १०.९, अहमदनगर ९.५, महाबळेश्वर ११.४, नाशिक १२.८, सांगली १२.८, सातारा १०.१, अमरावती १३, चंद्रपूर १२.८, नागपूर १३.६, यवतमाळ १६>२४ ते २५ जानेवारी : मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.२६ जानेवारी : विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहील. तुरळक ठिकाणी गारपीठ होईल.२७ जानेवारी : मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.