Join us  

मुंबईला दोन आयुक्त हवे हा तर मुंबई तोडण्याचा प्रश्नच नाही, अस्लम शेख यांचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2021 11:42 PM

Mumbai News : मुंबई व महाराष्ट्र एकसंघ राहावा ही महाआघाडी सरकारची ठाम  भूमिका आहे. तर उलट वेगळा विदर्भ करण्याची व 10 मुख्यमंत्री करण्याची मागणी राज्याचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली असून भाजपाच महाराष्ट्राचे तुकडे करू पाहत आहे.

- मनोहर कुंभेजकर मुंबई - मुंबई महानगर पालिकेला दोन आयुक्त हवेत अशी मागणी मुंबई शहराचे पालक मंत्री व राज्याचे मत्स्यव्यवसाय, वस्त्रोद्योग आणि बंदर खात्याचे मंत्री अस्लम शेख यांनी नुकतीच केली होती.मुंबईला जर दोन जिल्ह्याधिकारी, दोन पालक मंत्री असतील तर मग दोन आयुक्त पाहिजेत असा सवाल त्यांनी केला असून ते त्यांच्या मागणीवर ठाम आहेत.

यावर मंत्री व भाजपात सध्या आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. तर पालिकेचे विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी तर ही अस्लम शेख यांची वैयक्तिक भूमीका असून ती काँगसची अधिकृत भूमिका नाही असे सांगत या वादात उडी घेतली आहे.

 मुंबई भाजपाचे प्रभारी व कांदिवली ( पूर्व ) विधानसभा मतदार संघाचे आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारच्या सदर मंत्र्याची मागणी म्हणजे मुंबईचे तुकडे करण्याचा डाव असून भाजपा तो कदापी यशस्वी होऊ देणार नाही असा इशारा त्यांनी दिला होता.

लोकमत ऑनलाईन व लोकमतच्या अंकात यासंदर्भात सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते. मुंबई हे लोकसंख्येच्या दृष्टीने देशातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर असून जगातील  सातव्या क्रमांकाचे शहर आहे.तर सुमारे 34500 कोटींचे आर्थिक बजेट असलेली देशातील सर्वात श्रीमंत ही मुंबई महानगर पालिका आहे. माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दोन आयुत केल्याने जर मुंबईचे प्रश्न सुटत असतील तर मग 10 मुख्यमंत्री करा अशी मागणी ट्विट करत त्यांनी अस्लम शेख यांची खिल्ली उडवली होती.यावर देखिल त्यांनी भाष्य केले.

आता परत अस्लम शेख यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ जारी करत भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. मुंबई व महाराष्ट्र एकसंघ राहावा ही महाआघाडी सरकारची ठाम  भूमिका आहे. तर उलट वेगळा विदर्भ करण्याची व 10 मुख्यमंत्री करण्याची मागणी राज्याचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली असून भाजपाच महाराष्ट्राचे तुकडे करू पाहत आहे. देशातील वेगवेगळ्या राज्याचे विभाजन करून नवीन राज्य निर्माण करण्याचा तर केंद्र सरकारचा डाव असल्याची टिका त्यांनी केली. 

टॅग्स :मुंबईमुंबई महानगरपालिकाराजकारण