Join us  

विधानसभेतही शिवसेना दुप्पट जागा जिंकणार; सिनेट निवडणुकीत 'भगवा वॉश' दिल्यानंतर आदित्य ठाकरेंची गर्जना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2018 2:09 PM

शिवसेनेनं ठरवलं तर किती मोठा विजय मिळू शकतो.

मुंबईः मुंबई विद्यापीठ अधिसभेच्या (सिनेट) पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व दहा जागांवर युवा सेनेचा झेंडा फडकल्यानंतर शिवसेनेचे तरुण-तडफदार नेते आदित्य ठाकरे यांनी मोठी गर्जना केली आहे. शिवसेनेनं जिंकायचं ठरवलं तर किती मोठा विजय मिळू शकतो, हे या निवडणुकीतून आम्ही दाखवून दिलंय. त्यामुळे विधानसभेतही आत्तापेक्षा दुप्पट जागा मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 

सिनेट निवडणुकीतील विजयोत्सवानंतर आदित्य ठाकरे गुलालाने रंगले होते. या 'शत-प्रतिशत' विजयानंतर पुढचं लक्ष्य काय? या प्रश्नावर, 'पुढचं लक्ष्य उद्धव साहेबांनी जाहीर केलं आहेच. हा गुलाल तुम्हाला २०१९ मध्येही दिसेल', असं ते हसत-हसत म्हणाले. सत्ता द्या असं सांगतानाच, काय कामं केली याचा अहवालही आम्ही देतोय आणि त्याच जोरावर हा 'भगवा वॉश' आम्ही दिलाय. इतरांनी छुपी युती केली होती, पण मतदारांनी शिवसेनेवरच विश्वास दाखवला, असं म्हणत त्यांनी भाजपाला चिमटा काढला.  

शासनाने आखलेल्या नव्या कायद्यानुसार पहिल्यांदाच झालेल्या सिनेट निवडणुकीत दहा पैकी दहा जागा शिवसेनेच्या युवा सेनेनं जिंकल्यात. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा या निवडणुकीत धुव्वा उडाला. या निकालांनंतर, युवा सेनेचे विजयी उमेदवार आणि कार्यकर्ते जल्लोष करताहेत. त्यांच्या भेटीला आदित्य ठाकरे पोहोचले, तेव्हा त्यांना खांद्यावर घेऊन कार्यकर्त्यांनी छोटी मिरवणूकच काढली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांनी, शिवसेनेची विजय मालिका यापुढेही सुरू राहील, असा निर्धार केला. 

>> प्रत्येकालाच निवडणूक जिंकायची असते. शिवसेनेची फळी, युवा सेनेचे कार्यकर्ते आणि मतदारांमुळे हा विजय साकार झाला. 

>> काही जणांनी या निवडणुकीत हस्तक्षेप करून चांगल्या उमेदवाराला बाद करण्याचा प्रयत्न केला, इतरही अडथळे आणले, पण आता त्यांना माफ करूया. 

>> छुपी युती असली, तरी शिवसेनेनं जिंकायचं ठरवल्यास जिंकू शकतो, हे दाखवून दिलं.

>> आठ जागा होत्या, त्या दहा झाल्या. विधानसभेत दुप्पटपेक्षा जास्त होणार.  

>> २०१० मध्येही सगळे प्रतिस्पर्धी एकत्र आले होते. पण शिवसेनेनं तेव्हाही युती न करण्याची भूमिका घेतली. 

>> शिवसेनेवरचा विश्वास मुंबईकरांनी दाखवून दिला होता. लाटा असतानाही विधानसभेत ६३ जागा आल्या होत्या. हा विश्वास कायम राहील. 

टॅग्स :आदित्य ठाकरेमुंबई विद्यापीठ