मुंबई : केंद्र सरकारने ५00 तसेच १000 रुपयांच्या नोटा बाद करण्याची घोषणा मंगळवारी केली आणि देशभरातील खासगीसह सरकारी विभागांत एकच गोंधळ उडाला. यात वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलणाऱ्या मुंबई वाहतूक पोलिसांमध्येही संभ्रम निर्माण झाला. अखेर दंड वसुल करताना ५00 आणि १000 च्या नोटा न घेण्याचा निर्णय मुंबई वाहतूक पोलिसांकडून घेण्यात आला व तशा सूचनाच सर्व वाहतूक चौक्यांना देण्यात आल्या. वाहतूक नियमांचे उल्लंघन मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्याला चाप लावण्यासाठी दंडात मोठी वाढ करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला होता. या निर्णयाची १६ आॅगस्टपासून मुंबई वाहतूक पोलिसांकडून कठोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. त्यानुसार वाहन चालकांना दुप्पट ते दहापट दंड दयावा लागत आहे. नव्या नियमानुसार विना हेल्मेटसाठी आता ५00 रुपये, फॅन्सी नंबर प्लेटसाठी एक हजार रुपये, वेगाने वाहन चालवल्यास एक हजार रुपये, बेदरकारपणे वाहन चालवल्यास एक हजार, रेसिंगविरोधात दोन हजार, टेल लाईट्स व रिफ्लेक्टरशिवाय वाहने असल्यास एक हजार रुपये दंड आकारला जातो. तर अन्य दंड २00 आणि ५00 रुपये करण्यात आला आहे. त्यामुळे हा दंड आकारताना वाहन चालकांकडून ५00 आणि एक हजार रुपये दिले जावू शकतात. हे पाहता वाहतूक पोलिसांकडून या नोटा न स्विकारण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात सह पोलीस आयुक्त (वाहतूक)मिलिंद भारांबे यांनी सांगितले की,५00 आणि १000 रुपयांच्या नोटा आमच्याकडून स्विकारण्यात येणार नाहीत. एखाद्या चालकाला दंड आकारल्यावर सुट्टे पैसे न मिळाल्यास ई-चलान देऊन त्याच्याकडून नंतर पैसे वसुल करण्याचा पर्याय समोर ठेवण्यात आल्याचे सांगितले. मात्र दंड आकारल्यानंतर याच नोटा वाहन चालकांकडून दिल्या जात असल्याने पोलीस आणि वाहन चालकांमध्ये वादही होत होते. (प्रतिनिधी)नोटा देताना कर्मचारी, प्रवाशांमध्ये खटकेटॅक्सी, रिक्षा आणि मुंबई मेट्रोकडूनही ५00 आणि १000 रुपयांच्या नोटा न स्विकारण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे प्रवाशांचे मात्र हाल झाले. मेट्रोसाठी पास काढताना ५00 पेक्षा जास्त रुपये मोजावे लागत असल्याने या नोटा देताना कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये खटके उडताना दिसत होता. मेट्रो हा रेल्वेचा भाग नाही, असे स्पष्ट करत नोटा घेण्यास नकारच दिला. अखेर यात मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करत मेट्रो प्रशासनाला चलन स्विकारण्याचे निर्देश दिले आणि दुपारनंतर मेट्रोकडून चलन स्विकारण्यास सुरुवात झाली. काळ्या-पिवळ्या टॅक्सी, रिक्षा चालकांनी ५00 आणि १000 च्या नोटा स्विकारल्या नाहीत. प्रवासी वाहनांत बसण्याआधीच चालकांकडून प्रवाशांना सुट्टे पैसे देण्याचे आणि ५00 तसेच १000 च्या नोटा न देण्याचे आवाहन केले जात होते. या नोटा असल्यास प्रवाशांना नकारच दिला जात होता. त्यामुळे प्रवासी आणि चालकांत खटके उडत होते. ओला, उबेर मात्र यामुळे चांगलेच फॉर्मात आले. दूरवरच्या प्रवासात प्रवाशांची या नोटांमुळे होणारी अडचण पाहता या कंपन्यांनी आपली सेवा सुरुच ठेवणे पसंत केले. त्यामुळे या सेवेत प्रचंड वाढ झाली. एकट्या ओला टॅक्सीच्या मागणीत मंगळवारी रात्रीपासून देशभरात १,५00 टक्के वाढ झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. आॅनलाईन पेमेंटमुळे सुट्ट्या पैशांचा प्रश्न उद्भवला नाही.
मुंबई वाहतूक पोलिसांचीही नकार
By admin | Updated: November 10, 2016 03:57 IST