Join us  

मुंबईत आढळले १७२ क्षयरुग्ण, तर २ हजारांहून अधिक संशयित कुष्ठरुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 12:53 AM

असंसर्गजन्य आजारांच्या रूग्णांचा शोध मोहिम : ४५ लाख जणांची केली तपासणी

मुंबई - असंसर्गजन्य रुग्णांचा शोध घेण्यासाठी राज्यभरात राबविण्यात आलेल्या मोहिमेंतर्गत मुंबईत सुमारे ४५ लाख लोकांची तपासणी करण्याचे ठरविण्यात आले होते. त्यानुसार आशासेविकांची मदत घेऊन मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या घरोघरी जाऊनअसंसर्गजन्य आजारांचे आणि अतिजोखमीच्या रुग्णांची शोध मोहीम घेण्यात आली होती. या शोध मोहिमेतील निष्कर्षांनुसार, शहरउपनगरात १७२ क्षयरुग्ण आढळून आले. तर दोन हजारांहून अधिक संशयित कुष्ठ रुग्णांची नोंद करण्यात आली.

पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाद्वारे मिळालेल्या आकडेवारीनुसार, मुंबईतील १० लाख घरांचे सर्वेक्षण करण्याचे लक्ष्य होते. त्यातील ९ लाख २९ हजार २७ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले असून यातील २५ लाख ३५ हजार १४० जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या तपासणीत संशयास्पद टीबीचे ५ हजार ३४२ रुग्णांची नोंद करण्यात आली. यामध्ये ४ हजार १0८ रुग्णांच्या थुंकीची तपासणी करण्यात आली असून २ हजार ९८६ जणांचे एक्स-रे काढण्यात आले आहेत. तर १ हजार ७६ जणांची क्षयरोगविषयक चाचणी करण्यात आली. या सर्व वैद्यकीय चाचणीतून १७२ जणांना क्षयरोग असल्याचे निदान झाले आहे. १ हजार १२७ मुंबईकरांमध्ये कर्करोगाची लक्षणे आढळून आली आहेत. तर कुष्ठरोगासाठी २५ लाख मुंबईकरांची तपासणी करण्यात आली. ज्यापैकी २ हजार ३६२ संशयित कुष्ठ रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेतमहापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी सांगितले की, असंसर्गजन्य आजारांच्या रुग्णांचा शोध घेण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली होती. यामध्ये २ हजार ५०० हून अधिक कर्मचारी तसेच २२ विभागांतआरोग्य अधिकारी तपासणी करण्यासाठी नेमण्यात आले होते. त्यानुसार आता १३ लाख जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून वैद्यकीय चाचणीत कुठलाही आजार असल्याचे आढळून आल्यास अशा रुग्णांना पुढील उपचारांसाठी आरोग्य केंद्रात पाठवले आहे.