Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत गारवा वाढला

By admin | Updated: December 7, 2015 01:35 IST

डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात घसरण झाली आहे. परिणामी, शहरातल्या रात्रीच्या हवेतील गारवा वाढला

मुंबई : डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात घसरण झाली आहे. परिणामी, शहरातल्या रात्रीच्या हवेतील गारवा वाढला असून, ऊन-पावसाच्या खेळानंतर आता कुठे मुंबईकरांना हलकीशी थंडी जाणवू लागली आहे.मध्यंतरी अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मुंबईसह राज्यात पावसाची नोंद झाली होती. परिणामी, कमाल आणि किमान तापमानात काहीशी वाढ नोंदविण्यात आली होती. आता कमी दाबाचे क्षेत्र विरण्यासह हवामानात झालेल्या बदलामुळे कमाल आणि किमान तापमानात घसरण झाली आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश निरभ्र असून, कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३४, १९ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. हेच कमाल तापमान २७ ते २४ अंशाच्या आसपास असताना मुंबईकरांना काहीसा उकाडा जाणवत होता. मात्र आता किमान तापमान खाली घसरल्याने हवेत गारवा आला आहे. जसजसे उत्तरेकडून वाहणारे थंड वारे दक्षिणेकडे आणखी वेगाने वाहू लागतील; तसतसे थंडीची तीव्रता आणखी वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सद्य:स्थितीमध्ये दक्षिण-तामिळनाडू किनाऱ्यालगत असलेल्या श्रीलंका व कोमोरिनच्या भागावर कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. गेल्या २४ तासांत राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. ८ डिसेंबरपर्यंत संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. ९ डिसेंबर रोजी कोकणात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल. १० डिसेंबर रोजी कोकणासह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. (प्रतिनिधी)