Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत ऐन नाताळात गारठा झाला कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:04 IST

सर्वात कमी किमान तापमान गोंदियात ८.२ अंशलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : डिसेंबर अखेर मुंबईच्या किमान तापमानात घट होऊन ...

सर्वात कमी किमान तापमान गोंदियात ८.२ अंश

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : डिसेंबर अखेर मुंबईच्या किमान तापमानात घट होऊन मुंबईकरांना बोचऱ्या थंडीचा अनुभव घेता येईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. हा अंदाज खरा ठरत असला तरी मुंबईच्या किमान आणि कमाल तापमानात दक्षिणेकडील वाऱ्यांमुळे किंचित वाढ नोंदविण्यात येत आहे. परिणामी ऐन नाताळात गारठा किंचित कमी झाला आहे. २८ डिसेंबरनंतर उत्तरेकडील वाऱ्यांमुळे तापमानात घट होईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. परिणामी मुंबईसह राज्यात थंडीचा जोर कायम राहील.

भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात सर्वात किमान तापमान गोंदिया येथे ८.२ अंश नोंदविण्यात आले आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. विदर्भाच्या बऱ्याच भागात तर मराठवाड्याच्या तुरळक भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले.

दरम्यान, २७ ते ३० डिसेंबर या कालावधीत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. २७ डिसेंबर रोजी मुंबईत आकाश मोकळे राहील. २८ डिसेंबर रोजी मुंबईत आकाश अंशत: ढगाळ राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

* राज्यातील शहरांचे शनिवारचे किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)

मुंबई १९.४, पुणे १२.७, जळगाव १२.७, महाबळेश्वर १४, मालेगाव १३.४, नाशिक १४.६, सातारा १४.४, सोलापूर १५.२, औरंगाबाद १२.१, परभणी ११.४, नांदेड १२.५, अकोला १२.५, अमरावती १२.४, बुलडाणा १२.८, चंद्रपूर १०.६, गोंदिया ८.२, नागपूर १०.४, वाशिम ११.२, वर्धा ११