Join us

मुंबई, ठाणे, डोंबिवलीसह नागपूरचा श्वास काेंडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:18 IST

पर्यावरणतज्ज्ञांची माहिती : लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर प्रदूषणात वाढसचिन लुंगसेलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ...

पर्यावरणतज्ज्ञांची माहिती : लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर प्रदूषणात वाढ

सचिन लुंगसे

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी मार्च ते नोव्हेंबरदरम्यान लागू केलेल्या लॉकडाऊनदरम्यान महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांतील हवा समाधानकारक नोंदविण्यात आली होती. मात्र ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये शिथिल झालेल्या लॉकडाऊननंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र प्रदूषित नोंदविण्यात येत असून, पर्यावरणतज्ज्ञांच्या माहितीनुसार आजघडीला निम्मा महाराष्ट्र प्रदूषणाच्या छायेखाली आहे. आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेली मुंबई सातत्याने प्रदूषित नोंदविण्यात येत असून, मुंबई खालोखाल ठाणे, डोंबिवली आणि नागपूर सर्वाधिक प्रदूषित नोंदविण्यात येत आहेत.

मुंबईसह महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी लॉकडाऊन काळात हवा शुद्ध, समाधानकारक नोंदविण्यात आली. हवेची गुणवत्ता चांगली राहिली. मात्र लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर रस्त्यांवर वाहनांची संख्या आणि नागरिकांची वर्दळ वाढली. यामुळे प्रदूषणात वाढ होऊ लागली. हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक १०१ ते १५० दरम्यान नोंदविण्यात येऊ लागला. काही ठिकाणी हा निर्देशांक त्याहूनही पुढे नोंदविण्यात आला. परिणामी विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांना ही हवा धोकादायक ठरू लागली, अशी माहिती ग्रीन प्लानेट सोसायटीचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली. या प्रदूषणात धूळ, धूरसारख्या सूक्ष्म धूलिकणांचा समावेश असून, याचा धोका दिवसागणिक वाढतच आहे. विशेषत: प्रदूषित वायू यात भर घालत आहे.

दरम्यान, उद्योग, कोळसा ज्वलन, विविध वायूंचे ज्वलन, वाहतूक, कचरा ज्वलन, बांधकामे आणि रस्त्यावरील धूळ, घरगुती प्रदूषण हे प्रदूषणाचे स्रोत आहेत. चंद्रपूर, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, पुणे, रायगड, ठाणे, नाशिक, डोंबिवली, मुंबई, कल्याण, नवी मुंबई, कुर्ला, सायन, वरळी, मुलुंड, वांद्रे, कुलाबा, विलेपार्ले, कांदिवली, सोलापूर ही ठिकाणे सातत्याने प्रदूषित नोंदविण्यात येत आहेत. धूळ आणि वाहनांतून निघणारा धूर वायुप्रदूषणास कारणीभूत ठरत आहे.

----------------

* असा हाेताे परिणाम

- ० ते ५० दरम्यान नोंदविण्यात येणारा हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक चांगला मानला जातो.

- ५१ ते १०० पर्यंत नोंदविण्यात येणारा हवेच्या गुणवत्तेचा साधारण चांगला मानला जातो.

- १०१ ते १५० दरम्यान नोंदविण्यात येणारा हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक आजारी नागरिकांसाठी धोकादायक मानला जातो.

----------------

हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक

मुंबई : १४९

ठाणे : १११

डोंबिवली : १११

नागपूर : १०३

----------------